भारताच्या आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी बीसीसीआयच्या निवड समितीने संघाची घोषणा केली. आयपीएलचा तेरावा हंगाम संपल्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होणार आहे. २७ नोव्हेंबरपासून या दौऱ्याला सुरुवात होणार असून भारतीय संघ या काळात ३ वन-डे, ३ टी-२० आणि ४ कसोटी सामने खेळणार आहे. सुनिल जोशी यांच्या निवड समितीने रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव या दोन मुंबईकर खेळाडूंना संघात स्थान दिलेलं नाही. रोहितच्या दुखापीतमुळे निर्माण झालेला संभ्रम जरी लक्षात घेतला तरीही चांगली कामगिरी करुनही सूर्यकुमारचं नाव यंदा पुन्हा एकदा डावलण्यात आलं आहे. अनेक माजी खेळाडूंनी यावर नाराजी व्यक्त केली. भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि मुंबईकर क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर निवड समितीवर चांगलेच भडकले आहेत.

अवश्य पाहा – भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा, टी-२० ते कसोटी संपूर्ण संघ एका क्लिकवर…

“सूर्यकुमारला पुन्हा एकदा संधी नाकारण्यात आली आहे, मला खरंच आश्चर्य वाटतं. सध्याच्या घडीला भारतीय संघात निवड होण्यासाठी सूर्यकुमार अगदी योग्य उमेदवार होता. तो चांगल्या फॉर्मातही आहे. त्याच्यात चांगली गुणवत्ता आहे, भारतीय संघातील कोणत्याही खेळाडूसोबत मी त्याची तुलना करु शकतो. तो सातत्याने धावा करतोय. पण भारतीय संघात जागा मिळवण्यासाठी त्याला आणखी काय करावं लागणार आहे हे मला माहिती नाही. कोणताही फलंदाज आपल्या वयाच्या २६ ते ३४ या वयात चांगल्या फॉर्मात असतो. सूर्यकुमार सध्या तिशीत आहे. जर चांगला फॉर्म आणि फिटनेस हा भारतीय संघात निवड होण्याचा निकष नसेल तर नेमका निकष आहे तरी काय?? मला खरंच कोणीतरी समजावून सांगेल का?? रोहित दुखापतीमुळे संघात नसताना सूर्यकुमार भारतीय संघाला मधल्या फळीत उपयुक्त ठरु शकला असता. सूर्यकुमारला संघातून वगळण्यामागचे नेमका हेतू काय होता हा प्रश्न सौरव गांगुलीला विचारला जायला हवा”, वेंगसरकर टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

अवश्य वाचा – रोहितच्या निवडीबद्दलचा सावळागोंधळ, संघात स्थान न मिळण्यामागचं खरं कारण आलं पुढे

आयपीएलमध्ये याआधी KKR चं प्रतिनिधीत्व करणारा सूर्यकुमार यादव २०१८ सालच्या हंगामापासून मुंबई इंडियन्ससोबत खेळतो आहे. २०१२ पासून आतापर्यंत ९६ आयपीएल सामने खेळलेल्या सूर्यकुमार यादवने १ हजार ८२७ धावा केल्या आहेत. याचसोबत त्याच्या नावावर ९ अर्धशतकंही जमा आहेत. तरीही सूर्यकुमारला भारतीय संघात स्थान मिळत नसल्याने सर्वच स्तरातून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.