भारतीय संघाप्रमाणेच ‘बीसीसीआय’चे नेतृत्व करेन!

ला जे योग्य वाटेल आणि ‘बीसीसीआय’च्या भल्याचे वाटेल ते करण्यासाठी मी सदैव तत्पर असेन.

नवनिर्वाचित अध्यक्ष सौरव गांगुलीचा निर्धार

मुंबई : भारतीय संघाप्रमाणेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) नेतृत्व करेन. ‘भ्रष्टाचारमुक्त आणि सर्वासाठी समान बीसीसीआय’ यासाठी मी वचनबद्ध राहीन, अशी तत्त्वप्रणाली अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या सौरव गांगुलीने बुधवारी मांडली.

जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ असा लौकिक असलेल्या ‘बीसीसीआय’च्या अध्यक्षपदाची सूत्रे ४७ वर्षीय गांगुलीने बुधवारी स्वीकारली. २००० ते २००५ या कालखंडात देशाचे यशस्वी नेतृत्व सांभाळणाऱ्या गांगुलीने नव्या डावाला प्रारंभ करताना भारती क्रिकेट कर्णधाराचा गडद निळा कोट परिधान करून सर्वाचे लक्ष वेधले.

‘‘मला जे योग्य वाटेल आणि ‘बीसीसीआय’च्या भल्याचे वाटेल ते करण्यासाठी मी सदैव तत्पर असेन. ‘बीसीसीआय’च्या विश्वासार्हतेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. भ्रष्टाचारमुक्त आणि सर्वासाठी समानता हे धोरण मी राबवणार आहे. याच मार्गाने मला संघटनेला पुढे न्यायचे आहे,’’ असे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १८ हजारांहून अधिक धावा करणाऱ्या गांगुलीने सांगितले.

‘‘मी जेव्हा भारताचा कर्णधार झालो, तेव्हा हा कोट मला मिळाला होता. परंतु हा सैल होता, हे तेव्हा मला लक्षात आले नव्हते. परंतु आज महत्त्वाची जबाबदारी स्वीकारताना तो परिधान करण्याचा मी निर्णय घेतला,’’ असे गांगुलीने सांगितले.

‘बीसीसीआय’ची वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी संघटनेच्या मुख्यालयात झाली आणि सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीची ३३ महिन्यांचे वादग्रस्त प्रशासन संपुष्टात आले. २०१७ मध्ये सी. के. खन्ना यांच्याकडे प्रभारी अध्यक्षपदाची सूत्रे देण्यात आली होती. त्यानंतर गांगुली हा ‘बीसीसीआय’चा ३९वा अध्यक्ष झाला आहे.

गांगुलीने बंगाल क्रिकेट संघटनेमध्ये सचिव ते अध्यक्षपर्यंतचा प्रवास केला असल्याने अध्यक्षपदासाठी त्याच्याकडे फक्त नऊ महिन्यांचा कार्यकाळ शिल्लक आहे. सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या लोढा समितीच्या शिफारशींनुसार, कोणत्याही पदाधिकाऱ्याला सहा वर्षांच्या कार्यकाळानंतर तीन वर्षांचा स्थगित-काळ बंधनकारक असेल.

२०००मध्ये भारतीय क्रिकेटमध्ये सामना निश्चितीचे वादळ घोंघावत असताना नेतृत्वाची जबाबदारी गांगुलीकडे सोपवण्यात आली. त्या प्रकरणात मोहम्मद अझरुद्दीन केंद्रस्थानी होता. जो आता हैदराबाद क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष असल्याने ‘बीसीसीआय’च्या बैठकीसाठी प्रतिनिधी म्हणून हजर होता. बुधवारी बैठकीनंतर अझरुद्दीनने गांगुलीची भेट घेत आलिंगन दिले.

‘‘योगायोगाने, सुदैवाने किंवा दुर्दैवाने मी कर्णधारपदाची धुरा सांभाळली, तेव्हासुद्धा अशीच कठीण परिस्थिती होती. परंतु मी सहा वर्षे संघाचे नेतृत्व केले. आता भारतीय क्रिकेटची प्रतिमा सुधारण्यासाठी बरेच बदल करायचे आहेत. राज्य संघटनांना आर्थिक पाठबळ देणेसुद्धा आवश्यक आहे,’’ असे गांगुलीने सांगितले.

काही महिन्यांपूर्वी गांगुलीवरसुद्धा दुहेरी हितसंबंधांचे आरोप करण्यात आले होते. बंगाल क्रिकेट संघटनेचे अध्यक्षपद, ‘आयपीएल’मधील दिल्ली कॅपिटल्स संघाचे सल्लागार मार्गदर्शक या भूमिकांसंदर्भात त्याला ‘बीसीसीआय’च्या नीती अधिकाऱ्यांनी जाब विचारला होता. परंतु क्रिकेट सल्लागार समितीच्या निवड प्रक्रियेत कोणतीही अडचण येणार नसल्याचे त्याने स्पष्ट केले. प्रशिक्षक, सहाय्यक मार्गदर्शक आणि अन्य समित्यांची निवड करणाऱ्या या समितीमध्ये गांगुलीचा समावेश आहे. ‘‘दुहेरी हितसंबंध ही समस्या असली तरी सल्लागार समितीच्या नियुक्तीत ती आड येणार नाही, याची काळजी घेऊ,’’ असे गांगुलीने सांगितले.

गांगुलीपुढील आव्हाने

१. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेमधील भारताचे स्थान अबाधित राखताना योग्य आर्थिक वाटा मिळवणे.

२. २०१६चा ट्वेन्टी-२० विश्वचषक आणि भविष्यातील ‘आयसीसी’च्या स्पर्धासाठी करसवलत मिळवणे.

३. देशांतर्गत क्रिकेट सामन्यांसाठी क्रिकेटपटूंच्या मानधनात सुधारणा करणे.

४. स्थानिक क्रिकेट आराखडय़ाचा पुनर्विचार करणे. पंचांचा आणि खेळपट्टय़ांचा दर्जा सुधारणे.

५. प्रकाशझोतामधील कसोटी क्रिकेट सामन्यांचे आयोजन करणे.

६. दुहेरी हितसंबंधांच्या नियमांत बदल करून क्रिकेटपटूंना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी अनुकूल करणे.

कोणतेही मानधन नको, हे पहिल्याच बैठकीत स्पष्ट केले होते -गुहा

नवी दिल्ली : प्रशासकीय समितीच्या पहिल्याच बैठकीत मला कोणत्याही प्रकारचे मानधन नको, हे मी स्पष्ट केले होते, अशी माहिती नामांकित इतिहासतज्ज्ञ रामचंद्र गुहा यांनी बुधवारी दिली. गुहा आणि विक्रम लिमये यांनी आपल्या मानधनाचे अनुक्रमे ४० लाख रुपये आणि ५०.५ लाख रुपये नाकारले. ६१ वर्षीय गुहा यांनी जुलै २०१७ मध्ये वैयक्तिक कारणास्तव पदाचा राजीनामा दिला.

धोनीशी आदराचेच धोरण!

महेंद्रसिंह धोनीच्या भवितव्यासंदर्भात मी लवकरच चर्चा करीन. परंतु दोन वेळा विश्वविजेता कर्णधार धोनीची कारकीर्द संपेपर्यंत त्याच्याशी आदराचेच धोरण असेल, असे गांगुलीने सांगितले. धोनी काय विचार करीत आहे, हे मला ठाऊक नाही. परंतु त्याच्यासारख्या दर्जेदार खेळाडूचा त्याप्रमाणेच आदर केला जाईल, असे गांगुली यावेळी म्हणाला. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताचे आव्हान संपुष्टात आल्यापासून धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. त्यामुळे त्याच्या भवितव्याबाबत चर्चाना उधाण आले आहे. विजेते खेळाडू त्वरित संपत नाहीत. धोनी आपल्या कारकीर्दीविषयी काय विचार करीत आहे, हे मला माहीत नाही. परंतु त्याच्याशी चर्चा केल्यावर हे स्पष्ट होईल, असे गांगुलीने सांगितले.

मी विराटच्या पाठीशी, विरोधक नव्हे!

विराट कोहली हा भारतीय क्रिकेटमधील अतिशय महत्त्वाचा व्यक्ती आहे. त्यामुळे त्याला भारतीय क्रिकेट संघ सांभाळणे सोपे जाण्यासाठी मी त्याच्या पाठीशी असेन, विरोधात नव्हे, अशी प्रतिक्रिया गांगुलीने व्यक्त केली. ‘‘विराटशी मी गुरुवारी संवाद साधणार आहे. जगातील सर्वोत्तम संघ आपल्याला तयार करायचा असल्याने विराटला सर्वतोपरी साहाय्य करण्यासाठी कटिबद्ध असेन. गेल्या तीन-चार वर्षांत भारतीय संघाची कामगिरी प्रशंसनीय होत आहे,’’ असे गांगुली म्हणाला. याचप्रमाणे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह संघ व्यवस्थापनशीही मी चर्चा करणार आहे, असे संकेत गांगुलीने दिले आहेत. ‘‘संघाची कामगिरी ही सर्वात महत्त्वाची असते आणि म्हणूनच मी भारतीय क्रिकेटच्या भविष्याबाबत चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे. मी त्यांचे म्हणणे ऐकून घेईन आणि खेळाच्या दृष्टिकोनातून त्यांना साहाय्य करीन,’’ असे ४७ वर्षीय गांगुली म्हणाला.

READ SOURCE