‘बंगाल टायगर’ सौरव गांगुलीचा आज वाढदिवस. गांगुलीने आज वयाच्या ४९ व्या वर्षात पदार्पण केले. सौरव गांगुलीने त्याच्या कारकिर्दीत अनेक चांगल्या खेळी केल्या, पण त्याची नेतृत्वशैली ही अधिक चर्चेचा विषय ठरला. १९९९ च्या विश्वचषकानंतर भारतीय क्रिकेट संघातील काही खेळाडू मॅच फिक्सिंगच्या वादात अडकले. त्यानंतर नव्या भारतीय संघाची बांधणी करण्याची जबाबदारी सौरव गांगुलीवर होती. त्याने २००० सालानंतर नव्या दमाच्या खेळाडूंना सोबत घेऊन नवी टीम इंडिया उभी केली. याच टीम इंडियाने २००२ साली नॅटवेस्ट मालिकेत अंतिम सामन्यात विस्मयकारक असा विजय मिळवला आणि त्या साली झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे संयुक्त विजेतेपददेखील पटकावले. गांगुलीच्या आक्रमक स्वभावामुळे भारतीय संघाचा चेहरामोहरा बदलला.

क्रिकेट विश्वात टीम इंडियासा ‘घर में शेर, बाहेर ढेर’ असं म्हटलं जायचं. परदेशात भारतीय संघाच्या अपयशामुळे आणि भारतीय उपखंडातील यशामुळे भारतीय संघाची अशी प्रतिमा तयार झाली होती. पण गांगुलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही सामने जिंकण्यास सुरुवात केली. गांगुलीने आपल्या ‘दादा’गिरीने भारताला विजयाची सवय लावली. गांगुली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. त्याचा लॉर्डसच्या गॅलरीत टी-शर्ट फिरवून आनंद साजरा करतानाचा फोटो अजूनही लोकांच्या स्मरणात आहे. क्रीडा विश्वातून गांगुलीला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, सध्या BCCI अध्यक्ष म्हणून गांगुली आणि बोर्डापुढे IPL 2020 चे आयोजन करणं हा एकमेव महत्त्वाचा विषय आहे आणि त्यासाठी BCCI कसोशीने प्रयत्न करताना दिसत आहे.