‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’च्या प्रस्तावाबाबत गांगुलीची भूमिका

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेलबर्न/कोलकाता : भारतीय संघाने २०२१च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर एकाहून अधिक प्रकाशझोतातील कसोटी सामना खेळावा, असा प्रस्ताव ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ (सीए) संघटना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (बीसीसीआय) सादर करणार आहे. मात्र प्रकाशझोतात एकाहून अधिक कसोटी सामने नकोत, अशी भूमिका ‘बीसीसीआय’चा अध्यक्ष सौरव गांगुलीने घेतली आहे.

ऑस्ट्रेलियाचा संघ १४ जानेवारीपासून भारतात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या दौऱ्यावर ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’चे शिष्टमंडळ अध्यक्ष एर्ल इडिंग्ज यांच्या नेतृत्वाखाली ‘बीसीसीआय’च्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना भेटून आपला प्रस्ताव सादर करणार आहेत.

‘‘भारतीय संघाने पहिल्या प्रकाशझोतातील त्यांच्या पहिल्या कसोटीत आरामात विजय मिळवला. परंतु ऑस्ट्रेलियात अशा प्रकारचे सामने खेळण्याची उत्तम संधी त्यांना मिळेल. त्यामुळे एकापेक्षा अधिक प्रकाशझोतातील सामना खेळायचीही आमची तयारी आहे,’’ असे इडिंग्ज यांनी सांगितले.

‘एबीसी’ रेडिओला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’चे मुख्य कार्यकारी केव्हिन रॉबर्ट्स यांनी चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत एकाहून अधिक प्रकाशझोतातील सामने खेळवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. चारपैकी चारही सामनेसुद्धा प्रकाशझोतात खेळवल्यास माझी कोणतीही हरकत नाही, असे रॉबर्ट्स म्हणाले होते. भविष्यात आम्ही भारताशी पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहोत. त्या वेळी प्रकाशझोतातील दोन सामन्यांची संकल्पना निश्चित अस्तित्वात येऊ शकेल, अशी आशा इडिंग्ज यांनी व्यक्त केली आहे.

गांगुली यांनी ‘बीसीसीआय’च्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर आठवडय़ाभरात त्यांनी बांगलादेशला भारतीय संघाशी प्रकाशझोतातील पहिला सामना खेळण्यासाठी राजी केले. हा सामना भारताने एक डाव आणि ४६ धावांनी जिंकला.

‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ संघटनेकडून आमच्याकडे अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव अद्याप आलेला नाही. चार कसोटी सामन्यांपैकी दोन सामने प्रकाशझोतात खेळणे अति होईल. पारंपरिक कसोटी सामन्यांवर इतके आक्रमण करू नये. प्रत्येक मालिकेतील एखादा सामना प्रकाशझोतातील इथपर्यंत ठीक आहे.

– सौरव गांगुली, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा अध्यक्ष

भारतीय संघ प्रकाशझोतील कसोटी सामना खेळू लागला, हे स्वागतार्ह आहे. त्यांना खेळाची काळजी आहे, हेच यातून स्पष्ट होते. आमच्यात पत्रव्यवहार सुरू असून, मी जानेवारीत भारत दौऱ्यावर जाणार असून, त्या वेळी ‘बीसीसीआय’च्या पदाधिकाऱ्यांशी मालिकेतील दोन सामने प्रकाशझोतात खेळवण्याचा प्रस्ताव देईन.

– एर्ल इडिंग्ज, ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ संघटनेचे अध्यक्ष

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sourav ganguly view on day night test match in australia zws
First published on: 07-12-2019 at 04:11 IST