बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांची प्रकृती आता स्थिर आहे. गुरुवारी रात्री त्यांना शांत झोप लागली. बुधवारी अचानक अस्वस्थ वाटू लागल्यामुळे सौरव गांगुली यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. गांगुली यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर शुक्रवारी त्यांच्या आवश्यक चाचण्या करणार आहेत. भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

कोरोनरी धमन्यांचा मार्ग मोकळा करण्यासाठी ह्दयाजवळ आणखी दोन स्टेंट बसवण्यात आले आहेत. सौरव गांगुली यांची प्रकृती आता स्थिर असून, त्यांना चांगली झोप लागली. वरिष्ठ डॉक्टरांनी तपासण्या केल्यानंतर सौरव गांगुली यांना दुसऱ्या वॉर्डमध्ये हलवायचे की, नाही याचा निर्णय घेण्यात येईल असे रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉ. देवी शेट्टी आणि डॉ. अश्विन मेहता यांच्या टीमने गुरुवारी रात्री सौरव गांगुलीवर अँजिओप्लास्टी केली. त्यांचा नैसर्गिक श्वासोश्वास व्यवस्थित सुरु असल्यामुळे ऑक्सिजन सपोर्टही काढण्यात आला आहे. ह्दयविकाराच्या आजारामुळे बुधवारी महिन्याभरात दुसऱ्यांदा सौरव गांगुली यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.