तब्बल ४ महिने बंद असलेलं आंतरराष्ट्रीय क्रिकेट हळुहळु पूर्वपदावर येत आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाली आहे. भारतीय खेळाडू पुन्हा मैदानावर कधी उतरणार याबद्दल सर्वांना उत्सुकता आहे. परंतू आयपीएलचा तेरावा हंगाम हे बीसीसीआयचं पहिलं प्राधान्य आहे. डिसेंबर महिन्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. त्याआधी भारतीय संघ आंतरराष्ट्रीय सामने खेळणार नाहीये. आयसीसीच्या नवीन नियमांनुसार कोणत्याही दौऱ्यावर जाण्याआधी प्रत्येक संघाला दोन आठवडे क्वारंटाइन होणं गरजेचं आहे. मात्र बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने भारतीय खेळाडूंना दोन आठवडे हॉटेलमध्ये बसवून ठेवणं योग्य होणार नाही, यासाठी क्वारंटाइन कालावधी सात दिवसांचा करावा अशी विनंती क्रिकेट ऑस्ट्रेलियाला केली होती.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे नवनिर्वाचीत सीईओ निक हॉकले यांनी, भारतीय संघाला दोन आठवडे क्वारंटाइन व्हावं लागेल हे स्पष्ट केलं. “दोन आठवडे क्वारंटाइन कालावधी हा योग्य आणि गरजेचा आहे. त्यात बदल होणार नाही. पण भारतीय संघ जिथे क्वारंटाइन होणार आहे तिकडे खेळाडूंना सरावासाठी पूर्ण सोय करुन देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. आरोग्यविषयक तज्ज्ञांचं मत घेऊन भारतीय खेळाडूंना सरावाची पूर्ण संधी मिळेल याची काळजी आम्ही घेत आहेत.” हॉकले यांनी ESPNCricinfo शी बोलताना क्रिकेट ऑस्ट्रेलियाची बाजू मांडली.

आयसीसीने नुकताच ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकाचं आयोजन वर्षभरासाठी पुढे ढकललं आहे. त्यामुळे आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं आयोजन करण्याचा बीसीसीआयचा मार्ग आता मोकळा झाला आहे. यंदाच्या हंगामाचं आयोजन बीसीसीआय सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळात युएईमध्ये करण्याच्या तयारीत आहे. आयपीएल संपल्यानंतर भारतीय खेळाडू युएईमधूनच ऑस्ट्रेलियाला रवाना होतील. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये बीसीसीआय आयपीएलबद्दल काय निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.