दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पुणे कसोटी सामन्यात पाहुण्या संघाचा पहिला डाव २७५ धावांमध्ये संपुष्टात आला आहे. तळातल्या फलंदाजांनी दिलेल्या कडव्या झुंजीमुळे आफ्रिकेने सन्मानजनक धावसंख्या गाठली. केशव महाराज आणि वर्नन फिलँडर यांनी नवव्या विकेटसाठी १०९ धावांची भागीदारी करत भारतीय गोलंदाजांना चांगलच झुंजवलं. केशव महाराजने ७२ धावांची अर्धशतकी खेळी केली. अखेरीस रविचंद्रन आश्विनने केशव महाराजला बाद करत भारताला तिसऱ्या सत्रात यश मिळवून दिलं. भारताकडून रविचंद्रन आश्विनने ४, उमेश यादवने ३, मोहम्मद शमीने २ तर रविंद्र जाडेजाने एक बळी घेतला.

त्याआधी, केशव महाराज आणि वर्नन फिलँडरने तिसऱ्या सत्रात भारतीय गोलंदाजांना चांगलंच झुंजवलं. तिसऱ्या दिवशी चहापानापर्यंत दक्षिण आफ्रिकेने ८ गड्यांच्या मोबदल्यात १९७ धावांपर्यंत मजल मारली. उपहाराच्या सत्रानंतर मुथुस्वामी आणि कर्णधार फाफ डु-प्लेसिसला माघारी धाडण्यात भारतीय गोलंदाजांना यश आलं. रविंद्र जाडेजाने मुथुस्वामीला तर आश्विनने कर्णधार फाफ डु-प्लेसिसला माघारी धाडलं. डु-प्लेसिसने भारतीय गोलंदाजांचा समर्थपणे सामना करत ६४ धावांची अर्धशतकी खेळी केली, मात्र तो देखील फारकाळ मैदानात तग धरु शकला नाही. आफ्रिकेचे उरलेले फलंदाज आता झटपट माघारी परतणार असं वाटत असतानाच, फिलँडर आणि केशव महाराज यांनी संयमी खेळ करत भारतीय गोलंदाजांना यश मिळू दिलं नाही.

दरम्यान, पहिल्या डावात ६०१ धावांचा डोंगर उभा केल्यानंतर तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रापर्यंत भारतीय गोलंदांनी आफ्रिकेची अवस्था बिकट केली. उपहाराच्या सत्रापर्यंत दक्षिण आफ्रिकेने ६ गडी गमावत १३६ धावांपर्यंत मजल मारली. तिसऱ्या दिवशीही आफ्रिकेची सुरुवात खराबच झाली. मोहम्मद शमीने नॉर्ट्जेला माघारी धाडत आफ्रिकेला धक्का दिला. यानंतर डी-ब्रून आणि क्विंटन डी-कॉकही ठराविक अंतराने माघारी परतले. दुसऱ्या बाजूने कर्णधार फाफ डु-प्लेसिसने भारतीय गोलंदाजांचा समर्थपणे सामना करत एक बाजू लावून धरली.