डावखुरा वेगवान गोलंदाज ब्यूरान हेन्ड्रिक्सच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर भारतीय ‘अ’ संघाने दुसऱ्या डावातही सपशेल शरणागती पत्करली. त्यामुळे दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाने भारताचा दुसरा डाव फक्त १८५ धावांवर गुंडाळत १२१ धावांनी दुसरी आणि अखेरची कसोटी जिंकली. त्यामुळे दोन अनधिकृत कसोटी सामन्यांची मालिका दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाने १-१ अशी बरोबरीत सोडवण्यात यश मिळवले. पहिली कसोटी भारताने एक डाव आणि १३ धावांनी जिंकली होती.
विजयासाठी ३०७ धावांचे आव्हान स्वीकारलेल्या भारतीय ‘अ’ संघाची सकाळच्या सत्रात ५ बाद १८ अशी केविलवाणी अवस्था झाली होती. तेव्हा भारताचा संघ जेमतेम ५० धावा करेल, अशी चिन्हे दिसत होती. परंतु अजिंक्य रहाणे आणि वृद्धिमान साहा यांनी सहाव्या विकेटसाठी १६० धावांची भागीदारी करून भारताच्या दुसऱ्या कसोटीसह मालिका विजयाच्या आशा उंचावल्या. पण शतकाकडे कूच करणाऱ्या रहाणेला ८६ धावांवर हेन्ड्रिक्सने बाद केले आणि भारताचा डाव पुन्हा पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. भारताचा उर्वरित निम्मा संघ फक्त सात धावांवर तंबूत परतला. साहाने एकाकी झुंज दिली. त्याने ११ चौकारांसह नाबाद ७७ धावा केल्या. रहाणे आणि साहा वगळता भारताच्या एकाही फलंदाजाला दोन आकडी धावसंख्या रचता आली नव्हती. पहिल्या डावात ३६ धावांत ५ बळी घेणाऱ्या हेन्ड्रिक्सने दुसऱ्या डावात २७ धावांत ६ बळी घेतले.