दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू क्रिकेटपटू जे पी ड्यूमिनीने कसोटी आणि प्रथम श्रेणी क्रिकेटला अलविदा केला आहे. आता फक्त वन डे आणि टी- २० सामन्यांवर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे ड्यूमिनीने म्हटले आहे.

जुलैमध्ये इंग्लंड दौऱ्यात पहिल्या कसोटीतील पराभवानंतर जे पी ड्यूमिनीला संघातून वगळण्यात आले होते. यानंतर ड्यूमिनी मायदेशी परतला होता. तेव्हापासून ड्यूमिनी कसोटी क्रिकेटला अलविदा करणार अशी चर्चा होती. अखेर शनिवारी ड्यूमिनीने निवृत्ती स्वीकारत असल्याचे जाहीर केले. निवृत्तीच्या निर्णयाची माहिती देताना ३३ वर्षीय ड्यूमिनी म्हणाला, खूप विचारपूर्वक मी कसोटी आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेत आहे. दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्ड, कॅप क्रोबास, संघातील सहकारी, मित्र आणि कुटुंबीयांच्या पाठिंब्यामुळेच मी हा प्रवास करु शकलो. ४६ कसोटी सामन्यांमध्ये मला दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधीत्व करायची संधी मिळाली. मी हा अनुभव कधीच विसरु शकत नाही असे ड्यूमिनीने सांगितले. कसोटी संघात स्थान मिळणे ही माझ्यासाठी अभिमानास्पद बाब होती असेही त्याने नमूद केले.

भविष्यात मी टी-२० आणि वन डे सामन्यांवर लक्ष केंद्रीत करणार आहे, याशिवाय मला साथ देणाऱ्या माझ्या कुटुंबाकडेही आता लक्ष देणार असल्याचे सांगितले. जे पी ड्यूमिनीने २००८ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. पदार्पणात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पर्थ कसोटीत ड्यूमिनीने अर्धशतक ठोकले होते. पाचव्या विकेटसाठी १११ धावांची शतकी भागीदारी करत ड्यूमिनीने संघाच्या विजयात हातभार लावला. तर याच मालिकेत ड्यूमिनीने शतक ठोकून छाप पाडली. ड्यूमिनीने ४६ कसोटीत २,०१३ धावा केल्या असून यात सहा शतके आणि आठ अर्धशतकांचा समावेश आहे.