फलंदाज एबी डिव्हिलियर्सच्या नाबाद शतकाच्या जोरावर आफ्रिकेने भारताविरुद्ध झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात पाच धावांनी विजय मिळवला आहे. द. आफ्रिकेच्या संघाने भारतासमोर ३०४ धावांचे आव्हान दिले होते. मात्र, भारतीय संघ ५० षटकांत २९८ धावांपर्यंत मजल मारू शकला. या विजयासह आफ्रिकेने पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.
आफ्रिकेच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कर्णधार एबी डिविलियर्स (१०४) आणि फॉफ डु प्लेसिस (६२) यांच्या जोरदार फलंदाजीच्या बळावर द.आफ्रिकेने भारतासमोर विजयासाठी ३०१४ धावांचे लक्ष ठेवले होते. पाहुण्या संघाने ठराविक अंतराने विकेट पडत असतानाही निर्धारित ५० ओव्हर्समध्ये ३०३ धावा केल्या होत्या. डिव्हिलियर्सने ७३ चेंडूंचा सामना करताना सहा षटकार आणि पाच चौकारांच्या मदतीने १०४ धावा फटकावल्या होत्या. भारतातर्फे उमेश यादव आणि अमित मिश्राने प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. तर आर. अश्विनने एक विकेट घेतली होती. पण, दुखापतीमुळे आर अश्विन पूर्ण दहा ओव्हर टाकण्यास अशयस्वी ठरला.
द. आफ्रिकेच्या आव्हानला प्रत्युत्तर देण्यासाठी आलेला भारतीय संघ केवळ २९८ धावाचं करू शकला. या आव्हानासमोर रोहित शर्मा व शिखर धवनने ४२ धावांची भागीदारी करत चांगली सुरवात केली. धवन बाद झाल्यानंतर रोहित आणि अजिंक्य रहाणे यांनी भारताला सुस्थितीत नेले. मात्र, रहाणे ६० धावांवर बाद झाला. त्यानंतर रोहितने डावाची सूत्रे हाती घेत भारताला विजयाच्या दिशेने कूच केले. मात्र, तो अखेरपर्यंत खेळू शकला नाही. दीडशतक पूर्ण झाल्यानंतर तो इम्रान ताहीरच्या गोलंदाजीवर बाद झाला. यानंतर कर्णधार धोनीने शेवटपर्यंत लढत देत विजयाचा प्रयत्न केला. पण, अखेरच्या षटकांत रबाडाने केलेल्या अचूक गोलंदाजीपुढे भारतीय फलंदाज निष्प्रभ ठरले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 11, 2015 5:24 pm