डी’व्हिलियर्स, डय़ुमिनी यांची दमदार अर्धशतके
रोहित शर्माचे धडाकेबाज शतक व्यर्थ
क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणाऱ्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात अखेर दक्षिण आफ्रिकेने बाजी मारली. ए बी डी’व्हिलियर्स आणि जेपी डय़ुमिनी यांच्या दमदार अर्धशतकांच्या जोरावर पाहुण्या आफ्रिकेने भारतीय दौऱ्याचा शुभारंभ करत आम्ही आलो आहोत, अशी गर्जना केली आहे. रोहित शर्माच्या धडाकेबाज शतकाच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करताना १९९ धावांपर्यंत दमदार मजल मारली होती, पण त्याचे हे शतक व्यर्थच ठरले. आफ्रिकेने सातत्यपूर्ण फटकेबाजी करत हा सामना सात विकेट्सने जिंकला. अखेरच्या षटकांमध्ये तुफानी हल्ला चढवत सामना आफ्रिकेच्या बाजूने झुकवणाऱ्या डय़ुमिनीला सामनावीराच्या पुरस्कारने गौरवण्यात आले.
आफ्रिकेने दवाचा फायदा मिळावा म्हणून नाणेफेक जिंकत भारताला फलंदाजीसाठी पाचारण केले. खेळपट्टीचा अंदाज घेत रोहित पहिल्यांदा काही चेंडू खेळताना अडखळला खरा, पण एकदा जम बसल्यावर नजाकतभरे फटके आपल्या पोतडीतून काढत त्याने नजरेचे पारणे फेडले. शिखर धवनने (३) धावचीत होऊन आत्मघात केल्यावर विराट कोहलीला (४३) बरोबर घेत त्याने दुसऱ्या विकेटसाठी १३८ धावांची भागीदारी रचली. नवव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर चौकार लगावत रोहितने अर्धशतक झळकावले. स्थिरस्थावर झाल्यावर रोहितच्या बॅटमधून सहजपणातून येणारे नैपुण्यपूर्ण फटके पाहण्यात सारेच गुंग झाले होते. र्मचट डी लाँगच्या १५ व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर यष्टीरषकाच्या डोक्यावरून सहजपणे षटकार लगावत रोहित पहिल्या-वहिल्या शतकाला गवसणी घातली, पण शतक झळकावल्यावर तो जास्त काळ खेळपट्टीवर तग धरू शकला नाही. कायले अॅबॉटने १६ व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर कोहलीला (४३) आणि अखेरच्या चेंडूवर रोहितला बाद करत भारताला दुहेरी धक्के दिले. रोहितने ६६ चेंडूंमध्ये १२ चौकार आणि पाच षटकार लगावत १०६ धावांची खेळी साकारली. रोहित बाद झाल्यावर भारताला अखेरच्या चार षटकांमध्ये अपेक्षेप्रमाणे धावगती वाढवता आली नाही आणि त्यांना १९९ धावा करता आल्या.
भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना डी’व्हिलियर्सने संघाला झोकात सुरुवात करून दिली. त्याने ३२ चेंडूंमध्ये ७ चौकार आणि एक षटकार लगावत ५१ धावांची खेळी साकारली आणि संघाला विजयाचा पाया रचून दिला. डी’व्हिलियर्स बाद झाल्यावर कर्णधार फॅफ डय़ू प्लेसिस (४) झटपट बाद झाल्याने भारतीय संघ विजयाची स्वप्न पाहू लागला होता. पण डय़ुमिनीने भारताच्या स्वप्नांचा इमला भस्मसात केला. तब्बल दोनशेच्या ‘स्ट्राइक रेट’ने त्याने भारतीय गोलंदाजांचा समाचार घेतला. अक्षर पटेलच्या १६ व्या षटकातील अखेरच्या तिन्ही चेंडूंवर षटकार खेचत त्याने आम्ही सामना सोडलेला नाही, हे ठणकावून सांगितले. त्यानंतर संघाच्या विजयाची पताका आपल्या हातात ठेवत त्याने पहिल्या सामन्यावर दक्षिण आफ्रिकेचा झेंडा फडकवला. डय़ुमिनीने ३४ चेंडूंमध्ये १ चौकार आणि तब्बल ७ षटकार लगावत नाबाद ६८ धावांची दणकेबाज खेळी साकारली, त्याला फरहान बेहराडिनने (नाबाद ३२) चांगली साथ दिली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी १०५ धावांची अभेद्य भागीदारी रचत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
धावफलक
भारत : शिखर धवन धावचीत ३, रोहित शर्मा झे. मॉरिस गो. अबॉट १०६, विराट कोहली झे. डय़ुमिनी गो. अबॉट ४३, सुरेश रैना पायचीत गो. मॉरिस १४, महेंद्रसिंग धोनी नाबाद २०, अंबाती रायुडू धावचीत ०, अक्षर पटेल नाबाद २
अवांतर (लेगबाइज २, वाइड ८, नोबॉल १) ११
एकूण : २० षटकांत ५ बाद १९९
बादक्रम : १-२२, २-१६०, ३-१६२, ४-१८४, ५-१८४.
गोलंदाजी : कायले अबॉट ४-०-२९-२, कागिसो रबाडा ४-०-३२-०, र्मचट डि लाँज ४-०-४७-०, ख्रिस मॉरिस ४-०-४६-१, इम्रान ताहीर ३-०-३५-०, जेपी डय़ुमिनी १-०-८-०
दक्षिण आफ्रिका : हशिम अमला धावचीत ३६, एबी डी’व्हिलियर्स त्रि.गो. अश्विन ५१, फॅफ डू प्लेसिस त्रि.गो. अरविंद ४, जेपी डय़ुमिनी नाबाद ६८, फरहान बेहराडीन नाबाद ३२, अवांतर (लेगबाइज ५, वाइड ४) ९, एकूण १९.४ षटकांत ३ बाद २००
बादक्रम : १-७७, २-९३, ३-९५
गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार ४-०-४०-०, श्रीनाथ अरविंद ३.४-०-४४-१, मोहित शर्मा ४-०-४०-०, अक्षर पटेल ४-०-४५-०, रवीचंद्रन अश्विन ४-०-२६-१.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 3, 2015 2:15 am