शिखर धवन (७३) आणि सुरेश रैना (४१) यांनी पाया रचल्यानंतर महेंद्रसिंग धोनीने (३१*) युवराज सिंगच्या (१६*) साथीने विजयाचा कळस रचण्याचा जिद्दीने प्रयत्न केला. अखेरच्या षटकांत भारताला विजयासाठी १४ धावा हव्या होत्या. मग शेवटच्या चेंडूवर धोनीचा फटका चुकला आणि फक्त ४ धावांनी दक्षिण आफ्रिकेने सराव सामन्यात भारतावर मात केली.

दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद १९६ धावा केल्या. यात क्विंटन डी कॉक (५६) आणि जीन-पॉल डय़ुमिनी (६७) यांनी महत्त्वाचे योगदान दिले. भारताकडून हार्दिक पंडय़ाने ३६ धावांत ३ बळी घेतले. मग भारताने निर्धारित षटकांत ५ बाद १९३ धावा केल्या.

त्याआधी, सलामीवीर जेसन रॉयचे अर्धशतक आणि फिरकीपटू आदिल रशीदच्या गोलंदाजीच्या बळावर इंग्लंडने सराव सामन्यात न्यूझीलंडवर सहा विकेट्स राखून मात केली.