दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसिस याने आंतराराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचे संकेत दिले आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये पुढील टी२० विश्वचषक स्पर्धा होणार आहे. त्यासाठी आता फार काळ शिल्लक राहिलेला नाही. ती माझी कदाचित शेवटची स्पर्धा असेल, असे सूचक वक्तव्य त्याने केले. आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध आफ्रिकेचा एकमेव टी२० सामना होणार आहे. त्या आधी पत्रकारांशी बोलताना त्याने हे विधान केले.

ऑस्ट्रलियामध्येच डु प्लेसिसने २०१२ साली कसोटीमध्ये पदार्पण केले होते. त्यावेळी एक दिवसापेक्षाही जास्त काळ त्याने मैदानावर फलंदाजी केली होती आणि संघासाठी सामना वाचवला होता. त्याबाबतही डु प्लेसिसने मन मोकळे केले. माझी ती खेळी हा माझ्या कारकिर्दीतील सर्वोत्तम भाग आहे की नाही, हे मला माहिती नाही. पण मला ऑस्ट्रेलियात जाऊन त्यांच्याविरुद्ध खेळायला आवडते ही गोष्ट मला त्यावेळी समजली. मला माझ्यातील क्रिकेटपटू सापडला, असे तो म्हणाला.