दक्षिण आफ्रिकेसारख्या कसोटी क्रमवारीतील अव्वल स्थानावर असलेल्या संघावर विजय मिळवणे दूरच, पण सामना अनिर्णित राखणेही भारताला जमले नाही. संथ खेळपट्टीवर सामन्याच्या पाचव्या दिवशी भारतीय फलंदाज सन्मानजनक धावसंख्या उभारतील, हे स्वप्न दक्षिण आफ्रिकेच्या भेदक आणि अचूक माऱ्यापुढे धुळीस मिळाले. अजिंक्य रहाणेने ९६ धावा फटकावत एकाकी झुंज दिली खरी, पण अन्य फलंदाजांनी आफ्रिकेच्या गोलंदाजीपुढे शरणागती पत्करल्यामुळे भारताचा दुसरा डाव २२३ धावांवर आटोपला. विजयासाठी आवश्यक ५८ धावा दक्षिण आफ्रिकेने आरामात पूर्ण करीत भारतावर १० विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आणि मालिका १-० अशी खिशात घातली. कसोटी मालिकेत अजिंक्य राहण्याचा मान पटकावत आफ्रिकेच्या संघाने कॅलिसला विजयाच्या भेटीने अलविदा केला.
भारताची पाचव्या दिवसाची सुरुवातच दयनीय झाली. रविवारच्या २ बाद ६८ धावांवरून पुढे खेळताना डेल स्टेनने चेतेश्वर पुजारा (३२) आणि विराट कोहली (११) यांना अवघ्या तीन धावांमध्ये तंबूत धाडत भारताचे कंबरडे मोडले. पण त्यानंतर ठरावीक फरकाने भारताने तीन फलंदाज गमावले आणि त्यांची ६ बाद १५४ अशी अवस्था झाली. भारतीय फलंदाज नतमस्तक होत असताना रहाणेने मात्र दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीचा प्रखरपणे प्रतिकार केला. तळाच्या फलंदाजांना साथीला घेत त्याने भारताला दोनशे धावांचा पल्ला गाठून दिला. अजिंक्य नव्वदीमध्ये पोहोचल्यावर त्याच्याकडून शतकाची अपेक्षा होती, पण अखेरच्या फलंदाजाबरोबर फलंदाजी करताना त्याने जोखीम उचलली आणि त्याचे शतक अवघ्या चार धावांनी हुकले. रहाणेने तब्बल २१९ मिनिटे किल्ला लढवत ११ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ९६ धावांची खेळी साकारत एकाकी झुंज दिली, पण अखेर ती व्यर्थच ठरली. सामनावीर डेल स्टेनने या वेळी इशांत शर्माला बाद करीत कसोटी कारकिर्दीतील ३५० बळींचा टप्पा गाठला. दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये दमदार फलंदाजी करणाऱ्या ए बी डी व्हिलियर्सला या वेळी मालिकावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
विजयासाठी आवश्यक असलेल्या ५८ धावा आफ्रिकेने ११.४ षटकांमध्ये सहजपणे पूर्ण केल्या. कर्णधार ग्रॅमी स्मिथने (नाबाद २७) रोहित शर्माच्या १२व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर षटकार आणि चौथ्या चेंडूवर चौकार लगावत विजयावर शिक्कामोर्तब केले.
धावफलक
भारत (पहिला डाव) : ३३४
दक्षिण आफ्रिका (पहिला डाव) : ५००
भारत (दुसरा डाव) : शिखर धवन झे. डय़ू प्लेसिस गो. पीटरसन १९, मुरली विजय झे. स्मिथ गो. फिलँडर ६, चेतेश्वर पुजारा त्रिफळा गो. स्टेन ३२, विराट कोहली झे. डी व्हिलियर्स गो. स्टेन ११, रोहित शर्मा पायचीत गो. फिलँडर गो.  फिलँडर २५, अजिंक्य रहाणे त्रिफळा गो. फिलँडर ९६, महेंद्रसिंग धोनी झे. अल्विरो पीटरसन गो. रॉबिन पीटरसन १५, रवींद्र जडेजा झे. मॉर्केल रॉबिन पीटरसन ८, झहीर खान पायचीत गो. रॉबिन पीटरसन ३, इशांत शर्मा झे. डी व्हिलियर्स गो. स्टेन १, मोहम्मद शमी नाबाद १, अवांतर (बाइज ४, वाइड २) ६, एकूण ८६ षटकांत सर्व बाद २२३
बाद क्रम : १-८, २-५३, ३-६८, ४-७१, ५-१०४, ६-१४६, ७-१५४, ८-१८९, ९-२०६, १०-२२३
गोलंदाजी : डेल स्टेन २१-८-४७-३, व्हर्नन फिलँडर १६-४-४३-३, मॉर्नी मॉर्केल १६-६-३४-०, रॉबिन पीटरसन २४-३-७४-४, जे पी डय़ुमिनी ८-२-२०-०, फॅफ डय़ू प्लेसिस १-०-१-०.
दक्षिण आफ्रिका (दुसरा डाव) : ग्रॅमी स्मिथ नाबाद २७, अल्विरो पीटरसन ३१, अवांतर (वाइड १) १, एकूण ११.४ षटकांत बिनबाद ५९. गोलंदाजी : मोहम्मद शमी २-१-४-०, इशांत शर्मा ५-१-२९-०, रवींद्र जडेजा ४-०-१६-०, रोहित शर्मा ०.४-०-१०-०.
सामनावीर : डेल स्टेन; मालिकावीर : ए बी डी व्हिलियर्स.

फलंदाजांपैकी केवळ काही जणांनी आशिया उपखंडाबाहेर पाचपेक्षा जास्त कसोटी खेळल्या आहेत. त्यांच्यासाठी सर्वोत्तम संघाविरुद्ध परीक्षा पाहणाऱ्या खेळपटय़ांवर खेळणे हा समृद्ध करणारा अनुभव असेल.  कसोटी क्रिकेट हा पाच दिवस परीक्षा पाहणारा प्रकार आहे. एखाद्या दिवशी तुम्ही एखाद्या सत्रात वाईट खेळ करता आणि त्याचा विपरीत परिणाम कसोटीच्या निकालावर होतो.                                 -महेंद्रसिंग धोनी, भारतीय संघाचा कर्णधार

आम्हाला कॅलिससाठी जिंकायचे होते. त्याच्या अंतिम कसोटीचा शेवट विजयानेच व्हावा अशी आमची सर्वाची इच्छा होती. कॅलिसने संपूर्ण कारकिर्दीत सातत्यपूर्ण खेळ केला. ही कसोटीही त्याला अपवाद नाही. त्याच्या शतकी खेळीभोवती आफ्रिकेचा डाव आधारलेला होता.  कॅलिससारख्या खेळाडूला पर्याय मिळणे निव्वळ अशक्य आहे. मात्र त्याच्याकडून युवा खेळाडूंना चांगली प्रेरणा मिळेल.
-ग्रॅमी स्मिथ, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार