समकालिन क्रिकेटमधील महान अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिसच्या सांगता सोहळ्याची पटकथा ही स्वप्नवत अशीच होती. अखेरच्या सामन्यात त्याने संस्मरणीय शतक झळकावले आणि दक्षिण आफ्रिका संघानेही दणदणीत विजयासह कॅलिसला छानशी भेट दिली. गेली १८ वर्षे ज्याने प्रामाणिकपणे, निर्लेपपणे संघाची सेवा केली, त्या कॅलिसला संघाने सोमवारी हृद्य निरोप दिला.
सामना संपल्यावर कॅलिस म्हणाला की, ‘‘आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये चाहत्यांनी मला जो पाठिंबा दिला तो अद्भूत होता. आफ्रिकेची संघटना आणि संघ सहकाऱ्यांनी मला ज्या पद्धतीने निरोप दिला तो खासच होता, आता यापुढे अजून काय मागणार. कसोटीमधून निवृत्तीचा निर्णय घेणे माझ्यासाठी कठीण होते. महेंद्रसिंग धोनी आणि त्याच्या संघाने मला ‘गार्ड ऑफ ऑनर’ दिल्याबद्दल त्यांचे धन्यवाद. यापुढील आयुष्यात क्रिकेटची आठवण येईलच, पण त्यापेक्षा जास्त संघ सहकाऱ्यांबरोबर मैदानात आणि ‘ड्रेसिंग रूम’मध्ये व्यतीत केलेला वेळ माझ्या जास्त लक्षात राहील. या प्रवासात मला चांगले प्रशिक्षक, मित्र मिळाले. आई-बाबांनीही मला चांगले मार्गदर्शने केले, त्यांना माझा अभिमान वाटेल, अशी आशा आहे.’’
मैदानावरील पुरस्कार सोहळा आटोपल्यावर कॅलिस देशाचा झेंडा मिरवत मैदानाला फेरी मारायला निघाला, काही वेळात संघ सहकाऱ्यांनी त्याला आपल्या खांद्यावर घेत त्याची छानशी मिरवणूक काढली. मैदानाला फेरी मारल्यावर ‘ड्रेसिंग रूम’मध्ये परतताना ओठांवर समाधानाचे स्मित आणि डोळ्यांत आसू ठेवत त्याने साऱ्यांचाच निरोप घेतला.