होबार्ट कसोटीतील चौथ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव अवघ्या १६१ धावांवर संपुष्टात आणत कांगारुंवर दिमाखदार विजय मिळवला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या कायले अॅबॉटने सहा विकेट घेत ऑस्ट्रेलियाच्या डावाला खिंडार पाडले. या विजयासह आफ्रिकेने ऑस्ट्रेलियात तिस-यांदा कसोटी मालिका विजय मिळवला आहे.

दक्षिण आफ्रिकेचा संघ ऑस्ट्रेलिया दौ-यावर असून होबार्ट येथे दुसरा कसोटी सामना सुरु होता. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव अवघ्या ८५ धावांवर संपुष्टात आला होता. यानंतर फलंदाजीला आलेल्या दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात ३६१ धावा केल्या. पहिल्या डावात आफ्रिकेला  २४१ धावांची आघाडी मिळाली होती. क्विंंटन डी कॉकच्या शतकी खेळीच्या आधारे आफ्रिकेला ही आघाडी मिळाली होती. चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने २ बाद १२१ धावसंख्येवरुन खेळ सुरु केला. पण डेल स्टेनऐवजी संघात स्थान मिळालेल्या अॅबॉटने ऑस्ट्रेलियाचा फलंदाजांची दाणादाण उडवली.

कायले अॅबॉटने भेदक मा-यासमोर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी शरणागती पत्कारली. कांगारुंचे ८ फलंदाज फक्त ४० धावा काढून माघारी परतले आणि ऑस्ट्रेलियांचा दुसरा डाव १६१ धावांवर संपुष्टात आला. दक्षिण आफ्रिकेतर्फे कायले अॅबॉटने ७७ धावांमध्ये सहा विकेट घेतल्या. तर ऑस्ट्रेलियातर्फे उस्मान ख्वाजाच्या ६४ धावा वगळता अन्य कोणत्याही फलंदाजाला चमकदार कामगिरी करता आली नाही. आफ्रिकेने ऑस्ट्रेलियावर एक डाव आणि ८० धावांनी दणदणीत विजय मिळवला. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.

आमच्या मिडल ऑर्डरच्या फलंदाजांनी खेळपट्टीवर जास्त वेळ थांबणे अपेक्षित होते. पण या विजयाचे श्रेय दक्षिण आफ्रिकेला दिलेच पाहिजे. त्यांच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली अशी प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने दिली. या पराभवामुळे ऑस्ट्रेलिया संघ व्यवस्थापन, प्रशिक्षक आणि कर्णधार स्मिथ यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत.