दुसरी कसोटी आजपासून; रोहित की अजिंक्य प्रश्न ऐरणीवर

पहिल्या कसोटीत पराभव पत्करल्यानंतर भारतीय संघाला खडाडून जाग आली आहे. आता शनिवारपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीला सामोरे जाताना संघनिवडीचा गुंता सोडवण्याचे महत्त्वाचे आव्हान भारतासमोर असेल. रोहित शर्मा की अजिंक्य रहाणे, शिखर धवन की लोकेश राहुल आणि वेगवान माऱ्यात उमेश यादवचा समावेश करावा का, हे प्रश्न सध्या ऐरणीवर आहेत. मात्र दक्षिण आफ्रिकेविरुद्धची दुसरी कसोटी जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याचा निर्धार भारताने केला आहे.

दुसरी कसोटी गमावल्यास सलग नऊ कसोटी मालिका विजयानंतर भारताची विजयी घोडदौड रोखली जाईल. केपटाऊनच्या पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने ७२ धावांनी विजय मिळवून तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी प्राप्त केली आहे. २०१८-१९ या वर्षांत भारतासमोर परदेशातील १२ कसोटी सामन्यांचे आव्हान आहे. त्यापैकी दुसऱ्याच कसोटीला सामोरे जाताना भारताला आव्हान टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. दक्षिण आफ्रिकेला २-० अशी आघाडी घेऊ दिली, तरी आयसीसीच्या कसोटी क्रमवारीतील भारताचे अव्वल स्थान अबाधित राहणार आहे. परंतु त्या कामगिरीचे मायदेशात शल्यविच्छेदन निश्चितपणे होऊ शकेल.

दुसऱ्या कसोटीसह मालिका वाचवण्याचे आव्हान समोर असताना सुपरस्पोर्ट् पार्क येथील विशेष सराव सत्रात भारतीय खेळाडूंनी चार तास सराव केला. यात चेतेश्वर पुजाराला पहिल्या स्लीपमधील सराव देण्यात आला. याचप्रमाणे विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी नेट्समध्ये फलंदाजी केली. अजिंक्य रहाणेला या सत्रात फारशी संधी मिळाली नाही. त्याने शिखर धवन आणि साहाय्यक प्रशिक्षक संजय बांगरसोबत क्षेत्ररक्षणाचा सराव केला.

भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या माफक आव्हानापुढे कोलमडला होता. त्यामुळे धवनऐवजी लोकेश राहुलचा समावेश होण्याची शक्यता आहे. २९ कसोटी सामने खेळणाऱ्या धवनची सरासरी ४२.६२ धावांची आहे. मात्र ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या संघांविरुद्धच्या कामगिरीचा आढावा घेतल्यास धवनची ११ कसोटी सामन्यांतील सरासरी २७.८१ धावांची आहे. फक्त दक्षिण आफ्रिकेचा विचार केल्यास त्याची सरासरी १८ धावांपर्यंत खाली येते. २०१३-१४च्या आफ्रिका दौऱ्यात धवनला एकही अर्धशतक नोंदवता आले नव्हते. त्याची सर्वाधिक धावसंख्या २९ होती. पहिल्या कसोटीतील दोन्ही डावांमध्ये चुकीचे फटके खेळून तो बाद झाला. त्यामुळे धवनपेक्षा राहुल हा तंत्रशुद्ध फलंदाज आहे.

पहिल्या कसोटीमध्ये रोहितऐवजी अजिंक्य संघात हवा होता, अशी टीका भारतीय संघव्यवस्थापनावर झाली होती. मात्र सध्याच्या फॉर्मच्या बळावर रोहितला प्राधान्य देण्यात आले, असे स्पष्टीकरण विराटने दिले होते. या सामन्यात रोहितने दोन्ही डावांत अनुक्रमे ११ आणि १० धावा केल्या होत्या. मात्र फक्त एका कसोटीतील निकालानंतर रोहितला डावलण्याची शक्यता कमी दिसत आहे.

केपटाऊनला हार्दिक पंडय़ासहित चार वेगवान गोलंदाजांची भारताची रणनीती यशस्वी ठरली होती. त्यामुळे चार गोलंदाज निवडताना उमेश यादवला स्थान मिळेल का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. गुरुवारी उमेशने फलंदाजी आणि गोलंदाजीचा कसून सराव केला. इशांत शर्मा आजारपणातून सावरला आहे.

दक्षिण आफ्रिकेसाठी वेगवान गोलंदाज डेल स्टेनच्या जागी पर्याय निवडण्याचे आव्हान असेल. युवा गोलंदाज लुंगी गिडीला घरच्या मैदानावर पदार्पणाची संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. अष्टपैलू खेळाडू ख्रिस मॉरिसचाही उत्तम पर्याय त्यांच्याकडे आहे.

संघ

भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मुरली विजय, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), हार्दिक पंडय़ा, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, इशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमरा, पार्थिव पटेल.

दक्षिण आफ्रिका : फॅफ डय़ू प्लेसिस (कर्णधार), डील एल्गर, एडीन मार्कराम, हशिम अमला, टेंबा बव्हुमा, थीयूनिस डी ब्रूयने, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), केशव महाराज, मॉर्नी मॉर्केल, ख्रिस मॉरिस, व्हर्नन फिलँडर, कॅगिसो रबाडा, अँडीले फेहलुकवायो, लुंगी गिडी, डय़ुआनी ऑलिव्हर.

* सामन्याची वेळ : दु. १.३० वा.  ’थेट प्रक्षेपण : सोनी टेन १, ३.