दक्षिण आफ्रिकेला त्यांच्या सर्वोत्तम ११ खेळाडूंविषयी कोणतीही जाणीव नव्हती. तसेच कठीण परिस्थितीला सामोरे जाताना कोणतीही पर्यायी योजना नव्हती. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या विश्वचषक अभियानातील अपयशाच्या मालिकेचे कोणतेही आश्चर्य वाटले नाही, अशा शब्दांत माजी क्रिकेटपटू जॉन्टी ऱ्होड्सने ताशेरे ओढले आहेत.

‘‘विश्वचषक सुरू होण्याच्या एक महिना आधी त्यांची तयारी पाहता कुणीही त्यांच्याकडून फारशा अपेक्षा केल्या नव्हत्या. गेल्या १२ महिन्यांत त्याचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय निकाल तसे फारसे चांगले लागले नाही. त्यांना त्यांच्या सर्वोत्तम ११ खेळाडूंचीही माहिती नव्हती. विश्वचषकात तुम्ही तुमच्या ४०-६० धावांचे रूपांतर शतकामध्ये करणे गरजेचे असते, ते या संघातील खेळाडूंना जमले नाही. त्यासाठी त्याच्याकडे पर्यायी योजना नव्हती. तुम्ही जेव्हा विश्वचषक खेळायला जाता आणि चांगल्या ११ खेळाडूंची निवड तुम्ही करू शकत नाही, तेव्हा ती गोष्ट तुमच्या संघासाठी अडचणीची ठरू शकते,’’ असे ऱ्होड्सने एका मुलाखतीत म्हटले आहे. ऱ्होड्सने आत्तापर्यंत ५२ कसोटी आणि २४५ एकदिवसीय सामन्यांमध्ये आफ्रिकेचे प्रतिनिधित्व केले आहे.

‘‘भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये अंतिम सामना होईल. भारतीय संघाने सर्वच क्षेत्रांत चांगली कामगिरी केली आहे. केवळ क्षेत्ररक्षणच नाही तर उत्तम तंदुरुस्ती आणि चपळताही त्यांच्याकडे आहे,’’ असे ऱ्होड्सने सांगितले.