11 December 2017

News Flash

ऑस्ट्रेलियाला पर्थ कसोटीत विजयासाठी विक्रमी आव्हान

कसोटी क्रमवारीत अव्वल क्रमांकाच्या दिशेने दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम कसोटीत दमदार पाऊल

पी.टी.आय. पर्थ | Updated: December 3, 2012 12:36 PM

कसोटी क्रमवारीत अव्वल क्रमांकाच्या दिशेने दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम कसोटीत दमदार पाऊल टाकले. २ बाद २३० वरुन पुढे खेळणाऱ्या आफ्रिकेने ५६९ धावांचा डोंगर उभारला आणि ऑस्ट्रेलियापुढे ६३२ धावांचे विक्रमी आव्हान ठेवले. या प्रचंड लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवसअखेर बिनबाद ४० धावा केल्या आहेत.
हशीम अमला आणि एबी डीव्हिलियर्स यांनी झळकावलेली शतके तिसऱ्या दिवसाच्या खेळाचे वैशिष्टय़ ठरले. दुसऱ्या दिवसअखेर ९९ वर नाबाद असलेल्या अमलाने जॉन्सनच्या गोलंदाजीवर एक धाव घेत आपले १८वे शतक पूर्ण केले. अनुभवी जॅक कॅलिसला ३७ धावांवर मिचेल स्टार्कने बाद केले. मात्र यानंतर अमला आणि डीव्हिलियर्स जोडीने धावांची लयलूट केली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी १४९ धावांची भागीदारी केली. अमलाने शतकानंतरही ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर आक्रमण गाजवले. मात्र १९६ धावांवर असताना मिचेल जॉन्सनने त्याला बाद केले. अमला बाद झाल्यानंतर एबीने डावाची सूत्रे आपल्या हाती घेतली. सलग तीन रिव्हर्स स्वीपच्या फटक्यांच्या साह्य़ाने एबीने आपले शतक पूर्ण केले. मिचेल स्टार्क आणि मिचेल जॉन्सन यांच्या भेदक माऱ्यापुढे अन्य फलंदाजांना टिकाव धरता आला नाही आणि दक्षिण आफ्रिकेचा डाव ५६९ धावांवर आटोपला. डीव्हिलियर्सने २१ चौकार आणि ३ षटकारांसह १६९ धावांची खेळी केली. स्टार्कने ६ तर जॉन्सनने ४ बळी टिपले.  ६३२ धावांचे प्रचंड आव्हान मिळालेल्या ऑस्ट्रेलियाने सावध सुरुवात केली आणि कोणतीही विकेट न गमावता ४० धावा केल्या आहेत.  कसोटीचे दोन दिवस शिल्लक असून आफ्रिकेला विजयासाठी १० विकेट्सची तर ऑस्ट्रेलियाला अजूनही ५९२ धावांची आवश्यकता आहे.    

First Published on December 3, 2012 12:36 pm

Web Title: south africa leave australia with record chase