रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजच्या १५ व्या सामन्यात दक्षिण आफ्रिका लीजण्डस संघाने बांगलादेश लीजण्डस संघावर १० गडी राखून मात मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. प्रथम फलंदाजी करताना लीजण्डसने २० षटकात ९ गड्यांच्या मोबदल्यात १६० धावा केल्या. मात्र, या धावा विजय मिळवण्यासाठी कमीच पडल्या. आफ्रिके लीजण्डसच्या सलामीवीरांनीच हे आव्हान पूर्ण केले. या मालिकेच्या गुणतालिकेत श्रीलंकेचा संघ पहिल्या स्थानावर असून इंडिया लीजण्डसचा संघ दुसऱ्या स्थानी आहे. बांगलादेशवरील विजयामुळे आफ्रिकेने तिसरे स्थान मिळवले आहे. तर, इंग्लंड आणि वेस्ट इंडिंज यांच्यातील सामन्याच्या निकालानंतर चौथ्या स्थानी कोण येणार, हे स्पष्ट होईल.

रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिका लीजण्डस संघाने गोलंदाजीचा निर्णय घेतला. २९ धावांवर असताना बांगलादेश लीजण्डसने मेहरब हुसैनच्या (९) रुपाने आपली पहिली विकेट गमावली. त्यानंतर नजीमुद्दीन (३२), आफदाब अहमद (३९) आणि हनान सरकार (३६) यांनी महत्त्वपूर्ण खेळी करत संघाला मजबूत स्थितीत आणले. बांगलादेश लीजण्डसचा संघ एक मोठी धावसंख्या उभारणार असे वाटत होते, मात्र शेवटच्या काही षटकांमध्ये आफ्रिका लीजण्डसच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. बांगलादेश लीजण्डसने ठराविक अंतराने आपल्या महत्त्वाच्या फलंदाजांना गमावल्याने त्यांना दोनशेचा आकडा गाठता आला नाही. आफ्रिकेसाठी मकाया अँटिनी आणि शबाला यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या, तर क्रुगर, जोंडेकी आणि डू ब्रूयन यांनी प्रत्येकी एका खेळाडूला तंबूत परत पाठवलं

प्रत्युत्तरात खेळताना दक्षिण आफ्रिका लीजण्डसचे सलामीवीर अ‍ॅन्ड्र्यू पुटिक आणि मॉर्ने व्हॅन विक यांनी चांगली सुरुवात करत बांगलादेश लीजण्डसवर दबाव निर्माण केला. या दोघांनी १९.२ षटकांत संघाला जबरदस्त विजय मिळवून दिला. पुटिकने ५४ चेंडूंत ९ चौकार व एका षटकाराच्या मदतीने नाबाद ८२ तर मॉर्ने व्हॅन विकने ६२ चेंडूंत ९ चौकारांसह नाबाद ६९ धावा केल्या.

या दोघांनी स्पर्धेत आतापर्यंतची सर्वात मोठी भागीदारी रचली आहे. पुटिक-विक यांनी रायपूर येथे झालेल्या पहिल्या सामन्याचा विक्रम मोडला. इंडिया लीजण्डसचे सलामीवीर सचिन तेंडुलकर व वीरेंद्र सेहवाग यांनी ११४ धावांची नाबाद भागीदारी केली होती.