एकदिवसीय मालिकेतून स्मृतीची माघार

‘मानधनाच्या पुनरागमनाचा निर्णय तिच्या दुखापतीची पाहणी केल्यानंतर घेतला जाईल.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा भारताचा पहिला सामना आज

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेला सुरुवात होण्याआधीच भारतीय महिला क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर स्मृती मानधना हिने दुखापतीमुळे बुधवारपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतून माघार घेतली आहे.

२३ वर्षीय स्मृतीला रविवारी नेटमध्ये सराव करत असताना दुखापत झाली. यॉर्कर चेंडू स्मृतीच्या उजव्या पायाच्या बोटांवर आदळला. त्यामुळे तिला संपूर्ण मालिकेतून माघार घेतली आहे. तिच्या जागी अष्टपैलू खेळाडू पूजा वस्त्रकार हिचा समावेश करण्यात आला आहे.

‘‘मानधनाच्या पुनरागमनाचा निर्णय तिच्या दुखापतीची पाहणी केल्यानंतर घेतला जाईल. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतील फिजियोंनी अहवाल दिल्यानंतरच हा निर्णय घेतला जाईल. पायाला किरकोळ दुखापत झाली असून ती लवकरात लवकर बरी होईल, अशी आशा आहे. पायाला प्रचंड वेदना होत असल्या तरी त्यावर उपचार सुरू आहेत,’’ असे भारतीय महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक डब्ल्यू. व्ही. रामन यांनी सांगितले.

भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची ट्वेन्टी-२० मालिका ३-१ अशा फरकाने जिंकली होती. मात्र स्मृतीला चारही डावांमध्ये चमक दाखवता आली नव्हती. तिने २१, १३, ७ आणि ५ अशा धावा काढल्या होत्या. आता एकदिवसीय मालिकेत कर्णधार मिताली राज आणि झुलन गोस्वामी यांच्यावर भारताची भिस्त असेल. त्यांच्या जोडीला हरमनप्रीत कौर, जेमिमा रॉड्रिग्स आणि वेदा कृष्णमूर्ती असतील.

  •  सामन्याची वेळ : सकाळी ९.०० वा.
  •   थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २
READ SOURCE