कसोटी क्रिकेटमधील अव्वल स्थान निश्चित करणाऱ्या ‘वाका’ मैदानावरील तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी क्रिकेटरसिकांना नाटय़पूर्ण घडामोडींची अनुभूती घेता आली. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या फळीतील वेगवान माऱ्याने दक्षिण आफ्रिकेला रोखल्यानंतर कांगारूंचेही दोन फलंदाज दिवसअखेर तंबूत परतले होते.नाणेफेक जिंकल्यावर प्रथम फलंदाजी पसंत करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचा डाव फक्त २२५ धावांत संपुष्टात आला. अ‍ॅडलेड कसोटीत पदार्पणात सर्वाचे लक्ष वेधून घेणाऱ्या फॅफ डय़ू प्लेसिसने झुंजार फलंदाजीचा प्रत्यय पर्थवरही घडविला. पण उत्तरार्धाच्या तासाभराच्या खेळात ऑस्ट्रेलियाचीही २ बाद ३३ अशी दैना उडाली होती. ईडी कोवान (०)  आणि शेन वॉटसन (१०) हे फलंदाज बाद झाले असून, डेव्हिड वॉर्नर आणि नाइट वॉचमन नॅथन लिऑन अनुक्रमे १२ आणि ७ धावांवर खेळत आहेत.
सातव्या स्थानावर फलंदाजीला उतरणाऱ्या प्लेसिसने पुन्हा एकदा द. आफ्रिकेला तारले. ६ बाद ७५ अशी केविलवाणी अवस्था झाली असताना प्लेसिस मैदानावर आला. मग त्याने १४२ चेंडूंत नाबाद ७८ धावांची खेळी उभारली.अ‍ॅडलेड कसोटी अनिर्णीत राहिल्यानंतर ऑस्ट्रेलियाने महत्त्वाचे पाऊल उचलताना पीटर सिडल, बेन हिल्फेन्हॉस आणि जेम्स पॅटिन्सन या पहिल्या फळीतील वेगवान माऱ्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला. डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सनला १२ महिन्यांनंतर पहिल्या कसोटीसाठी पाचारण करण्यात आले. मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांत १२वा खेळाडू राहिलेल्या मिचेल स्टार्कची मुख्य संघात वर्णी लागली, तर जॉन हेस्टिंग्सला पदार्पणाची संधी मिळाली. ऑफ-स्पिनर लिऑनने ४१ धावांत ३ बळी घेतले, तर जॉन्सन आणि स्टार्क यांनी प्रत्येक दोन बळी घेतले.