विशाखापट्टणम कसोटीत भारतीय संघाने वेस्ट इंडिजवर २०३ धावांनी मात करत ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली. सलामीवीर रोहित शर्मा आणि मयांक अग्रवाल यांच्या शतकी खेळी आणि रविचंद्रन आश्विन-मोहम्मद शमी आणि रविंद्र जाडेजा यांच्या भेदक माऱ्यामुळे आफ्रिकेचा संघ सामन्यात पुनरागमन करुच शकला नाही. या विजयासह भारतीय संघाने आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे.

या मालिकेतला दुसरा सामना १० ऑक्टोबरपासून पुण्याच्या गहुंजे येथील मैदानावर खेळवला जाणार आहे. आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत आपलं पहिलं स्थान कायम राखण्यासाठी भारतीय संघाला या मालिकेत विजय मिळवणं गरजेचं आहे. सोमवारी दुपारी दोन्ही संघ पुण्यात दाखल झाले. यावेळी आपल्या लाडक्या क्रिकेटपटूंना पाहण्यासाठी चाहत्यांनी विमानतळाबाहेर गर्दी केली होती.