मुंबईकर रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे या जोडगोळीने झळकावलेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर, रांची कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताने आपला डाव सावरला आहे. चहापानानंतरच्या सत्रात पाऊस आणि अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला, यावेळी भारताने ३ गड्यांच्या मोबदल्यात २२४ धावांपर्यंत मजल मारली होती. रोहित शर्मा ११७ तर अजिंक्य रहाणे ८३ धावांवर नाबाद खेळत होता. दोन्ही फलंदाजांनी चौथ्या विकेटसाठी १८५ धावांची भागीदारी रचत आफ्रिकेला बॅकफूटवर ढकललं.

त्याआधी, कगिसो रबाडाने केलेल्या भेदक माऱ्यामुळे रांची कसोटीच्या पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेने चांगली सुरुवात केली. नाणेफेक जिंकून भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दोन कसोटी सामन्यांत आक्रमक खेळी करणाऱ्या भारताची सुरुवात खराब झाली. सलामीवीर मयांक अग्रवाल कगिसो रबाडाच्या गोलंदाजीवर डीन एल्गरकडे झेल देऊन माघारी परतला. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला पुजाराही भोपळा न फोडता माघारी परतला. कगिसो रबाडानेच पुजाराला बाद केलं. विराट कोहली आणि रोहित शर्माने भारतीय संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र नॉर्ट्जेच्या गोलंदाजीवर कर्णधार विराट कोहलीला पंचांनी पायचीत म्हणून घोषित केलं. यामुळे भारताची अवस्था ३ बाद ३९ अशी झाली होती.

यानंतर, रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांनी भारताचा डाव सावरला. रोहित शर्माने आफ्रिकन गोलंदाजांचा समाचार घेत शतक झळकावलं. या मालिकेतलं रोहितचं हे तिसरं शतक ठरलं, तर कसोटी कारकिर्दीतलं हे सहावं शतक ठरलं. सलामीचे ३ फलंदाज माघारी परतल्यानंतर रोहितने अजिंक्यच्या साथीने भारताचा डाव सावरला. खेळपट्टीवर पाय रोवल्यानंतर अजिंक्य आणि रोहितने मैदानात चौफेर फटकेबाजी केली. अजिंक्य रहाणेनेही अर्धशतकी खेळी करत त्याचा चांगली साथ दिली. दक्षिण आफ्रिकेकडून कगिसो रबाडाने २ तर नॉर्ट्जेने १ बळी घेतला.