14 December 2019

News Flash

IND vs SA : मयांकचे दिमाखदार शतक, पहिल्या दिवसअखेर भारत ३ बाद २७३

पहिल्या दिवशी भारत सुस्थितीत

भारताचा सलामीवीर मयांक अग्रवाल याचे शतक (१०८) आणि त्याला चेतेश्वर पुजारा (५८) व कर्णधार विराट कोहली (नाबाद ६३) यांची लाभलेली साथ याच्या बळावर भारताने पहिल्या दिवशी सामन्यावर पकड निर्माण केली. त्यामुळेच आफ्रिकेविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताला पहिल्या दिवसअखेर ३ बाद २७३ धावांपर्यंत मजल मारता आली.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारतीय संघाची या सामन्यात सुरुवात खराब झाली, पहिल्या कसोटीत दोन्ही डावांत शतकं झळकावणाऱ्या रोहित शर्माला कगिसो रबाडाने क्विंटन डी-कॉकच्या हाती झेल द्यायला भाग पाडलं. त्यानंतर मयांक-पुजारा जोडीने खेळपट्टीवर जम बसवत भारतीय डावाला आकार दिला. दुसऱ्या विकेटसाठी दोन्ही फलंदाजांनी १३८ धावांची भागीदारी केली. या भागीदारीदरम्यान दोन्ही फलंदाजांनी आपली अर्धशतके पूर्ण केली. अखेरीस कगिसो रबाडाने चेतेश्वर पुजाराला माघारी धाडत भारताची जमलेली जोडी फोडली.

पुजारा नंतर मैदानावर आलेल्या कर्णधार विराटने चांगली खेळी करत सामन्यात रंगत आणली. या दरम्यान मयांक अग्रवालने मालिकेतील सलग दुसरे झळकावले. पण १०८ धावांवर तोदेखील माघारी परतला. त्यालाही रबाडानेच तंबूचा रस्ता दाखवला. विराटने मात्र आपला खेळ सुरू ठेवत अर्धशतक झळकावले आणि दिवसाचा खेळ संपेपर्यंत उपकर्णधार अजिंक्य रहाणे याच्यासोबत सावध खेळ केला. सध्या विराट ६३ धावांवर तर रहाणे १८ धावांवर खेळत आहे.

दरम्यान, पुण्याच्या गहुंजे मैदानावर खेळवला जाणारा दुसरा कसोटी सामना हा कर्णधार या नात्याने विराट कोहलीचा ५० वा सामना आहे. या सामन्यात पुण्याची खेळपट्टी पाहून भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात हनुमा विहारीला विश्रांती देत उमेश यादवला संघात संधी दिली आहे.

First Published on October 10, 2019 11:43 am

Web Title: south africa tour of india 2nd test pune day 1 updates psd 91
Just Now!
X