श्रीलंकेच्या दौऱ्यावर असलेल्या दक्षिण आफ्रिका संघाची सुरुवात खराब झालेली आहे. गॅले येथील पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेने दक्षिण आफ्रिकेवर २७८ धावांनी विजय मिळवला. दुसऱ्या डावात श्रीलंकेने दिलेल्या ३५२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना दक्षिण आफ्रिकेचा संघ अवघ्या ७३ धावांमध्ये माघारी परतला. श्रीलंकेकडून दुसऱ्या डावात दिलरुवान पेरेराने ६ बळी घेतले.

सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेच्या दिमुथ करुणरत्नेच्या शतकी खेळीच्या जोरावर २८७ धावांपर्यंत मजल मारली. दक्षिण आफ्रिकेच्या स्टेन, फिलँडर, रबाडा या जलदगती गोलंदाजांच्या तोफखान्याचा मारा श्रीलंकेचे इतर फलंदाज करु शकले नाहीत. मात्र करुणरत्नेने नेटाने किल्ला लढवत १५८ धावांची नाबाद शतकी खेळी केली. त्याच्या या खेळीत १३ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. आफ्रिकेकडून कगिसो रबाडाने ४ आणि तबरेझ शम्सीने ३ बळी घेतले. यांना स्टेन आणि फिलँडरने १-१ बळी घेत चांगली साथ दिली.

प्रत्युत्तरादाखल पहिल्या डावात फलंदाजीसाठी उतरलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ पुरता कोलमडला. कर्णधार फाफ डु प्लेसिसच्या ४९ धावांचा अपवाद वगळता आफ्रिकेचा एकही फलंदाज श्रीलंकेच्या गोलंदाजांसमोर तग धरु शकला नाही. श्रीलंकेकडून दिलरुवान पेरेराने ४, सुरज लकमलने ३ बळी घेतले. त्यांना रंगना हेरथने २ तर संदकनने १ बळी घेत चांगली साथ दिली. यानंतर श्रीलंकेचा दुसरा डाव १९० धावांमध्ये गारद झाल्याने, सामना जिंकण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघाला ३५२ धावांचं आव्हान देण्यात आलं.

मात्र लंकेने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेला आफ्रिकेचा संघ पुरता कोलमडला. दिलरुवान पेरेराने आफ्रिकेच्या डावाला खिंडार पाडत सामन्यावर आपल्या संघाचं वर्चस्व प्रस्थापित केलं. दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेचे केवळ ३ फलंदाज दोन आकडी धावसंख्या गाठू शकले. लंकेच्या माऱ्यासमोर आफ्रिकेचा संपूर्ण संघ अवघ्या ७३ धावांमध्ये गारद झाला. दुसऱ्या डावात श्रीलंकेकडून पेरेराने ६ तर रंगना हेरथने ३ बळी घेतले, संदकनला एक बळी मिळाला. पहिल्या डावात शतकी खेळी करणाऱ्या दिमुथ करुणरत्नेला सामनावीराचा किताब देऊन गौरवण्यात आलं.