चौथी कसोटी आजपासून वाँडर्स स्टेडियमवर

चेंडूत फेरफार प्रकरणामुळे टीकेच्या भडिमाराला सामोरे जावे लागत असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाचे मनोबल खचले आहे. याच गोष्टीचा फायदा उचलून चौथ्या आणि अंतिम कसोटीत त्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी यजमान दक्षिण आफ्रिकेचा संघ सज्ज झाला आहे. शुक्रवारपासून जोहान्सबर्ग येथील वाँडर्स स्टेडियमवर ही लढत सुरू होणार आहे. या सामन्यात विक्रमी विजय मिळवून प्रमुख गोलंदाज मॉर्ने मॉर्केलला अविस्मरणीय निरोप देण्याचा निर्धारही आफ्रिकेच्या खेळाडूंनी केला आहे.

ऑस्ट्रेलियावर संकट आले असले तरी प्रशिक्षक ओटिस गिब्सन यांनी आफ्रिकेच्या खेळाडूंना सावधानतेचा इशारा दिला आहे. स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरून बँक्रॉफ्ट यांच्या हकालपट्टीनंतरही ऑस्ट्रेलियाचा संघ कडवे आव्हान देऊ शकतो, असे मत गिब्सन यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘ऑस्ट्रेलियाचा संघ विखुरलेल्या मन:स्थितीत आहे. मात्र तरीही तो एक चांगला संघ आहे आणि त्यांच्याकडे चांगले खेळाडू आहेत. त्यांच्या जलदगती गोलंदाजांच्या चमूचा मी चाहता आहे.’’