फलंदाजीत कर्णधार अ‍ॅरॉन फिंच, स्टिव्ह स्मिथ आणि गोलंदाजीत अ‍ॅश्टन अ‍ॅगरने केलेल्या धडाकेबाज खेळाच्या जोरावर, ऑस्ट्रेलियाने पहिल्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर मात केली आहे. जोहान्सबर्गच्या मैदानात कांगारुंनी आफ्रिकेला विजयासाठी १९७ धावांचं आव्हान दिलं होतं, मात्र हे आव्हान त्यांना पेलवलं नाही, अ‍ॅगरच्या फिरकीसमोर आफ्रिकन फलंदाजांनी शरणागती पत्कारली. १०७ धावांनी सामना जिंकत कांगारुंनी मालिकेत आघाडी घेतली आहे.

आफ्रिकेचा कर्णधार क्विंटन डी-कॉकने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कांगारुंचा डावखुरा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला डेल स्टेनने अवघ्या ४ धावांवर माघारी धाडत संघाला पहिलं यश मिळवून दिलं. मात्र यानंतर कर्णधार अ‍ॅरॉन फिंच आणि स्टिव्ह स्मिथ यांनी मैदानात आपलं जम बसवत धावा जमवण्यास सुरुवात केली. दुसऱ्या विकेटसाठी दोन्ही फलंदाजांनी ७० धावांची भागीदारी रचली. शम्सीने फिंचला माघारी धाडत कांगारुंची जोडी फोडली, त्याने ४२ धावा केल्या. यानंतर ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी फटकेबाजी करत संघाला आव्हानात्मक धावसंख्या गाठता येईल याची काळजी घेतली. आफ्रिकेकडून डेल स्टेन आणि तबरेज शम्सी यांनी प्रत्येकी २-२ तर एन्गिडी आणि फेलुक्वायो यांनी १-१ बळी घेतला.

प्रत्युत्तरादाखल आफ्रिकेच्या संघाची सुरुवातच खराब झाली. कर्णधार क्विंटन डी-कॉक २ धावांवर स्टार्कच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. यानंतर आफ्रिकेच्या डावाला लागलेली गळती थांबूच शकली नाही. ४० धावांत आफ्रिकेचे ४ फलंदाज माघारी परतले. यानंतर अ‍ॅश्टन अ‍ॅगरने आठव्या षटकात फाफ डु प्लेसिस, अँडल फेलुक्वायो आणि डेल स्टेन यांना माघारी धाडत हॅटट्रीकची नोंद केली. यानंतर दक्षिण आफ्रिकेचे तळातले फलंदाज फारशी झुंज देऊ शकले नाही. कांगारुंनकडून अ‍ॅगरने ५ तर अ‍ॅडम झॅम्पा आणि पॅट कमिन्सने प्रत्येकी २-२ तर मिचेल स्टार्कने १ बळी घेतला.