झुंजार बांगलादेशविरुद्ध आज दुसरी लढत

१९९२नंतर विश्वचषक स्पर्धेत सलामीच्या सामन्यात फक्त दुसऱ्यांदा पराभूत होणारा दक्षिण आफ्रिकेचा संघ यातून सावरण्यासाठी उत्सुक आहे. इंग्लंडविरुद्ध मानहानीकारक पराभव पत्करावा लागल्यानंतर रविवारी बांगलादेशविरुद्ध लंडनच्या ओव्हल मैदानावर होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात पहिल्या विजयाचे ध्येय दक्षिण आफ्रिकेने बाळगले आहे.

विश्वचषक स्पर्धेच्या उद्घाटनाच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला इंग्लंडकडून १०४ धावांनी पराभूत व्हावे लागले होते. काहीशा गोंधळात टाकणाऱ्या ओव्हलच्या खेळपट्टीवर दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला ८ बाद ३११ धावांवर रोखले होते. मात्र जोफ्रा आर्चरच्या वेग आणि उसळीसमोर दक्षिण आफ्रिकेची २०७ धावांवर दाणादाण उडाली होती. आता पुन्हा याच मैदानावर होणाऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना आपला खेळ उंचवावा लागणार आहे.

२००७च्या विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेसारख्या बलाढय़ संघाला ‘सुपर-एट’ फेरीत ६७ धावांनी हरवले होते. त्या संघातील चार खेळाडू अद्यापही बांगलादेश संघातून खेळत असल्यामुळे जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानी असलेल्या बांगलादेशला कमी लेखण्याची चूक दक्षिण आफ्रिकेसाठी महागात ठरू शकते.

बांगलादेशसमोर खडतर आव्हान

मश्रफी मोर्तझाच्या नेतृत्वाखालील बांगलादेशचा संघ आर्यलड आणि वेस्ट इंडिजविरुद्धची तिरंगी मालिका जिंकून विश्वचषकासाठी सज्ज झाला असला तरी त्यांच्यासमोर पहिल्या तीन सामन्यांत खडतर आव्हान असणार आहे. दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि अव्वल स्थानी असलेल्या इंग्लंडचा सामना त्यांना करावा लागणार आहे. मात्र सकारात्मक निकालाची आशा न धरता तिन्ही संघांना कडवी लढत देण्याची रणनीती बांगलादेशने आखली आहे. मुशफिकर रहीमवर बांगलादेशच्या मधल्या फळीची भिस्त असली तरी तो चांगल्या लयीत आला आहे, ही बांगलादेशसाठी जमेची बाजू म्हणावी लागेल.

शकिबवर फिरकीची धुरा

अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत अग्रस्थानी असलेल्या शकिब अल हसनची कामगिरी बांगलादेशसाठी नेहमीच महत्त्वपूर्ण ठरली आहे. महत्त्वाच्या क्षणी तोच संघासाठी तारणहार ठरला आहे. शकिबचे फलंदाजीतील योगदान तसेच प्रभावी डावखुरी फिरकी ही दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरू शकते.

आफ्रिकेची मदार वेगवान गोलंदाजांवर

बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातही फलंदाजांपेक्षा वेगवान गोलंदाजांवरच दक्षिण आफ्रिकेची मदार राहणार आहे. लुंगी एन्गिडीने इंग्लंडविरुद्ध तीन बळी मिळवत छाप पाडली होती. त्याचबरोबर कॅगिसो रबाडा यानेही दोन बळी मिळवत इंग्लंडच्या फलंदाजांना वेसण घातली होती. आता बांगलादेशच्या फलंदाजांना रोखायचे असेल तर दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना कामगिरीत सातत्य ठेवावे लागणार आहे. त्यांना लेग-स्पिनर इम्रान ताहीरची चांगली साथ लाभत आहे.

  • केनिंग्टन ओव्हल मैदानावर झालेल्या गेल्या आठ सामन्यांपैकी दक्षिण आफ्रिकेला केवळ एकच विजय मिळवता आला आहे. २०१७च्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत आफ्रिकेने श्रीलंकेला हरवले होते.
  • सलामीवीर क्विंटन डी’कॉकला एकदिवसीय क्रिकेटमध्ये ८००० धावांचा टप्पा गाठण्यासाठी ४५ धावांची आवश्यकता असून हाशिम अमलालाही हे शिखर गाठण्यासाठी अद्याप ७७ धावांची गरज आहे.