दक्षिण आफ्रिका-इंग्लंड कसोटी मालिकेत समोरासमोर
भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत दारुण पराभव झालेला दक्षिण आफ्रिकेचा संघ आणि दुबईच्या आखातात पाकिस्तानसमोर निष्प्रभ ठरलेला इंग्लंड संघ यांच्यात विजयपथावर परतण्यासाठी चुरस आहे. बेसिल डी ऑलिव्हरा मालिकेतील पहिल्या कसोटीत हे दोन संघ समोरासमोर असणार आहेत.
भारतीय संघाने चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेवर ३-० असा विजय मिळवला, तर पाकिस्तानने इंग्लंडवर २-० अशी मात केली होती. संथ, धिम्या आणि फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर दाणादाण उडालेल्या खेळपट्टय़ांपासून दोन्ही संघांची सुटका झाली आहे.
इंग्लंडचा संघ सलामीवीराच्या भूमिकेसाठी आणखी एक प्रयोग करणार आहे. अ‍ॅलिस्टर कुकच्या साथीने अ‍ॅलेक्स हेल्सला संधी देण्यात आली आहे. ट्वेन्टी-२० विशेषज्ञ हेल्ससाठी डेल स्टेन, मॉर्ने मॉर्केल आणि कायले अबॉट यांच्या माऱ्याला सामोरे जाणे आव्हानात्मक असणार आहे. बऱ्याच कालावधीनंतर निक कॉम्पटनचे संघात पुनरागमन झाले असून तो तिसऱ्या क्रमांकावर खेळणार आहे. जो रूट, जेम्स टेलर आणि बेन स्टोक्स यांच्यावर मधल्या फळीची जबाबदारी आहे. अष्टपैलू मोइन अली इंग्लंडसाठी जमेची बाजू आहे. पोटरीचे स्नायू दुखावल्यामुळे जेम्स अँडरसन या कसोटीत खेळू शकणार नाही. त्याच्या अनुपस्थितीत स्टुअर्ट ब्रॉड वेगवान माऱ्याची धुरा सांभाळणार आहे. ख्रिस वोक्स आणि स्टीव्हन फिन त्याला साथ देतील.
दक्षिण आफ्रिकेने ए बी डी’व्हिलियर्सकडे पुन्हा एकदा यष्टिरक्षण सोपवले आहे. यामुळे स्टॅनिअल व्हॅन झीलचा पुनरागमनाचा मार्ग मोकळा झाला आहे. हशीम अमला, फॅफ डू प्लेसिस यांच्याकडून मोठय़ा खेळीची अपेक्षा आहे. तेंबा बावूमा आणि जे पी डय़ुमिनी यांच्या खेळात सातत्य येणे आवश्यक आहे. मांडीचे स्नायू दुखावल्यामुळे भारताविरुद्धच्या मालिकेत खेळू न शकलेला डेल स्टेन संघात परतल्यामुळे दक्षिण आफ्रिकेची गोलंदाजी मजबूत झाली आहे. कागिसो रबाडा आणि कायले अबॉट यांच्यात तिसऱ्या गोलंदाजाच्या स्थानासाठी चुरस आहे. इम्रान ताहीर आणि सिमॉन हार्मेर या फिरकीपटूंना संघातून डच्चू देण्यात आल्याने डेन पिडटचे अंतिम अकरातील स्थान पक्के झाले आहे.
दरबानची खेळपट्टी फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीसाठी पोषक आहे. घरच्या मैदानावर विजयपथावर परतण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ आतुर आहे.

थेट प्रक्षेपण : टेन क्रिकेट
वेळ : दुपारी १.३० पासून