झिम्बाब्वेविरुद्धची एकमेव दिवस-रात्र कसोटी आजपासून; चार दिवसांच्या कसोटीचा प्रयोग

झिम्बाब्वेविरुद्धच्या एकमेव दिवस-रात्र कसोटीपूर्वी दक्षिण आफ्रिकेसमोर संघनिवडीचे मोठे आव्हान आहे. उभय संघांमधील ही कसोटी मंगळवारपासून सेंट जॉर्ज पार्क मैदानावर खेळली जाणार आहे.

आयसीसी कसोटी क्रमवारीमध्ये दुसऱ्या स्थानी असलेल्या यजमानांना प्रतिस्पध्र्याबाबत फारशी चिंता नाही. मात्र भारताविरुद्धच्या महत्त्वपूर्ण कसोटी मालिकेच्या पाश्र्वभूमीवर दक्षिण आफ्रिका मंडळ चार दिवसीय सामन्यामध्ये सवरेत्कृष्ट संघ उतरवण्यास उत्सुक आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेला ५ जानेवारी २०१८ पासून केपटाऊनमध्ये सुरुवात होत आहे.

एबी डी’व्हिलियर्स आणि डेल स्टेनच्या पुनरागमनामुळे यजमान संघात आणखी स्थिरता आली आहे. दक्षिण आफ्रिकेचे आघाडीच्या फळीचे सर्व वेगवान गोलंदाज वर्षभर तंदुरुस्त असल्याचे प्रथमच पाहायला मिळाले आहे. त्यामुळे संघनिवड करताना निवड समितीचा कस लागणार आहे.

संघनिवडीतील चुरस हे संघाच्या दृष्टीने चांगले द्योतक असल्याचे दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक ओटिस गिब्सन यांनी म्हटले आहे. ‘‘भारताचा संघ आयसीसी क्रमवारीमध्ये अव्वल स्थानी आहे. त्यांच्यावर विजय मिळवण्यासाठी आम्हाला सवरेत्कृष्ट संघ निवडावा लागेल. घरच्या मैदानावर भारताला हरवण्याचे लक्ष्य आम्ही ठेवले आहे,’’ असे गिब्सन म्हणाले.

भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत सहा की सात फलंदाज खेळवायचे? तीन की चार वेगवान गोलंदाजांना संधी द्यायची? त्यात किती फिरकीपटू निवडायचे? तसेच किती अष्टपैलू असावेत? असे अनेक प्रश्न प्रशिक्षक ओटिस यांच्यासह निवड समिती सदस्यांना सतावत आहेत.

आनुवंशिक समानता कायद्यामुळे दक्षिण आफ्रिका मंडळाच्या अडचणींमध्ये अधिकच भर पडली आहे. मुख्य संघात कमीत कमी सहा क्रिकेटपटू श्वेत आणि कृष्णवर्णीय असतील, असे आश्वासन मंडळाने दिले आहे. त्यात दोन कृष्णवर्णीय क्रिकेटपटूंचा समावेश बंधनकारक आहे.

फलंदाज टेम्बा बवुमा, अष्टपैलू अ‍ॅन्डिले फेहलुक्वायो आणि वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडा हे तीन कृष्णवर्णीय क्रिकेटपटू बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळले. मात्र डी’व्हिलियर्ससह वेगवान गोलंदाज डेल स्टेन, व्हर्नन फिलँडर आणि मॉर्नी मॉर्केलमुळे वरील तिघांपैकी केवळ रबाडाला मुख्य संघात स्थान मिळण्याची खात्री आहे.

खांद्याच्या शस्त्रक्रियेतून सावरणारा कर्णधार फॅफ डय़ू प्लेसिस हा तंदुरुस्त चाचणीमध्ये उत्तीर्ण झाला आहे. त्यामुळे फलंदाज बवुमाला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. जगातील चार सवरेत्कृष्ट वेगवान गोलंदाज असताना मध्यमगती फेहलुक्वायोचा समावेश कठीण वाटतो.

पाहुण्या झिम्बाब्वे संघाने सराव सामन्यात निराशा केली. पार्लमध्ये झालेल्या लढतीत त्यांना आमंत्रित संघाविरुद्ध मात खावी लागली. पहिल्या दिवस-रात्र कसोटीपूर्वी दक्षिण आफ्रिका संघाने शुक्रवारी विद्युतझोतात सराव केला. त्यात दिवसातील सरावाच्या तुलनेत वेगवान गोलंदाजांना अधिक मदत मिळाल्याचे दिसले.

  • सामन्याची वेळ : सायं. ५ वा.
  • थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स.

चार दिवसीय कसोटीसाठीचे नियम

दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे यांच्यातील चार दिवसांच्या एकमेव दिवस-रात्र कसोटीमध्ये लागू करण्यात येणाऱ्या नव्या नियमांना आयसीसीने यजमान मंडळाला परवानगी दिली आहे.

  • प्रत्येक दिवसाचा खेळ साडेसहा तासांचा राहील. पाच दिवसांच्या कसोटीपेक्षा अर्धा तास अधिक खेळ खेळला जाईल.
  • प्रत्येक दिवशी ९० ऐवजी ९८ षटकांचा खेळ होईल.
  • पहिल्या दोन सत्रांचा कालावधी २ तास १५ मिनिटे असा राहील. पाच दिवसांच्या कसोटीमध्ये हा कालावधी दोन तासांचा असतो. पहिले सत्र संपल्यानंतर उपाहाराऐवजी चहापानाची २० मिनिटांची विश्रांती असेल. याचप्रमाणे दुसऱ्या सत्रानंतर रात्रीच्या भोजनासाठी ४० मिनिटांची विश्रांती राहील.
  • कोणत्याही दिवशी अपूर्ण राहिलेली षटके पुढील दिवसाच्या खेळामध्ये समाविष्ट केली जाणार नाहीत.
  • फॉलोऑन लादताना दोन्ही संघांच्या धावसंख्येतील फरक १५० धावांचा राहील. पारंपरिक कसोटीमध्ये हा फरक २०० धावांचा असतो.