दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या पहिल्या टी २० सामन्यात यजमान आफ्रिकेने श्रीलंकेवर सुपर ओव्हरच्या माध्यमातून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत श्रीलंकेने २० षटकात ७ बाद १३४ धावा केल्या. या डावात कमिंडू मेंडिस याने २९ चेंडूत ४१ धावा केल्या. त्याच्या खेळीच्या जोरावरच श्रीलंकेला १३० चा आकडा गाठता आला. त्याला इतर फलंदाजांनी फारशी साथ दिली नाही, पण ५ फलंदाजानी दुहेरी धावसंख्या करत धावफलक हलता ठेवला. आफ्रिकेकडून फेलूकव्हायोने सर्वाधिक ३ बाली टिपले.

१३५ धावांचे सोपे वाटणारे आव्हान आफ्रिकेला पेलले नाही. आफ्रिकेच्या डावाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. डेव्हिड मिलरच्या ४१ धावांमुळे आफ्रिकेच्या विजयाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. त्याला व्हॅन ड्युसेन याने चांगली साथ देत २१ धावा केल्या होत्या. पण फलंदाजीस आलेल्या तळाच्या ५ फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. त्यामुळे आफ्रिकेचा डाव देखील २० शतकात ८ बाद १३४ धावांवर थांबला.

अखेर हा सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. श्रीलंकेकडून अनुभवी लसिथ मलिंगा याला ही जबाबदारी सोपवण्यात आली. त्याच्या पहिल्या २ चेंडूवर केवळ १-१ धाव निघाली. पण नंतर मात्र मिलरने तिसऱ्या चेंडूवर षटकार आणि पाचव्या चेंडूवर चौकार लगावत सुपर ओव्हरमध्ये आफ्रिकेला १४ धावा करून दिल्या. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी श्रीलंकेने फटकेबाजीत निपुण असलेल्या थिसारा परेराला मैदानात धाडले. त्याच्या जोडीला अविष्का फर्नांडोला पाठवण्यात आले. पण आफ्रिकेच्या इम्रान ताहिरने दोनही खेळाडूंना अजिबात फटकेबाजी करू दिली नाही. त्याने ६ चेंडूत केवळ ५ धावा दिल्या आणि सामना यजमानांनी खिशात घातला. अप्रतिम फलंदाजी केलेल्या डेव्हिड मिलरला सामनावीर जाहीर करण्यात आले.