तिसरा ट्वेन्टी-२० सामना पावसामुळे रद्द

 डय़ुमिनी मालिकावीर

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा ट्वेन्टी-२० सामना पावसामुळे एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आला. इडन गार्डन्सवर सामन्यापूर्वीच पावसाने हजेरी लावली होती. काही वेळाने पाऊस थांबला असला तरी इडन गार्डन्सवर मैदानावर साचलेले पाणी काढण्यासाठी दर्जेदार सुविधा नसल्याने अखेर रात्री साडे दहा वाजता सामना न खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिले दोन्ही सामने जिंकल्यामुळे दक्षिण आफ्रिकेने यापूर्वीच मालिका खिशात टाकली होती, त्यामुळे त्यांना मालिका विजयाचा चषक देऊन गौरविण्यात आले आणि आमच्यासारखे आम्हीच असल्याचे पाहुण्यांनी दौऱ्यातील पहिल्या मालिकेत दाखवून दिले. यावेळी दक्षिण आफ्रिकेचा डावखुरा तडफदार फलंदाज जेपी डय़ुमिनीला मालिकावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.

मैदानात पाऊस पडत असताना काही भागांवर आवरणे टाकण्यात आली नव्हती. त्याचबरोबर मैदानात साचलेले पाणी उपसण्यासाठी तीन सुपर सोपर्स लावण्यात आले असले तरी निर्धारीत वेळेत त्यांना मैदानातून पाणी काढण्यात अपयश आले. पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेने दोनशे धावांचे आव्हान समर्थपणे पेलत विजय मिळवला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्यांनी भारताला ९२ धावांमध्ये रोखत सामना सहजपणे जिंकला होता. त्यामुळे इडन गार्डन्सवरील सामन्यापूर्वी त्यांनी २-० अशी विजयी आघाडी घेतली होती.