क्रिकेटच्या मैदानावर आपल्या व्यक्तीमत्त्वाने आणि खेळाने क्रीडारसिकांच्या मनावर छाप पाडणाऱ्या खेळाडूंची यादी तशी मोठीच. त्यातही भारतामध्ये या खेळाला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळाल्यामुळे एका फक्त आपल्या देशातीलच नव्हे तर, आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंसाठीही क्रीडारसिकांच्या मनात स्थान निर्माण झालं. अशा या खेळाडूंमध्ये येणारं सर्वांच्याच आवडीचं नाव म्हणजे एबी डिव्हिलियर्स. दक्षिण आफ्रिका संघातील या खेळाडूविषयी सांगावं, लिहावं आणि बोलावं तितकं कमीच. आपल्या अष्टपैलू व्यक्तीमत्त्वाने क्रिकेटचं मैदान गाजवणाऱ्या एबीडीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयानंतर काही क्षणांसाठी चाहत्यांना धक्काच बसला. मुळात एबीडीने हा निर्णय का घेतला, असा भावडा प्रश्न विचारणाऱ्यांची संख्या यात तुलनेने जास्त.

भविष्याचा विचार करत दूरदृष्टी ठेवत त्याने घेतलेल्या या निर्णयाला क्रीडाविश्वातून दुजोरा देत अनेकांनीच या ‘३६० डिग्री मॅन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खेळाडूनचं कौतुक केलं. तसं पाहायला गेलं की तर एबीडी जेव्हा मैदानावर येतो तेव्हा त्याच्या नुसत्या असण्यानेच विरोधी संघाचे धाबे दणाणतात असं म्हणायला हरकत नाही. अशा या खेळाडूच्या कारकिर्दीत आजवर त्याने बऱ्याच सामन्यांमध्ये अफलातून खेळी दाखवली आहे. चला तर मग नजर टाकून त्यातीलच काही निवडक खेळींवर…

वाचा : IPL 2018 – शिक्षणासाठी मुंबई इंडियन्सच्या ‘या’ खेळाडूने सोडलं क्रिकेट

२१७* (विरुद्ध भारत), २००८, दुसरा कसोटी सामना- अहमदाबाद
एबी डिव्हिलियर्सने आतापर्यंतच्या कारकिर्दीत झळकवलेल्या दोन द्विशतकांपैकी हे त्याचं पहिलं द्विशतक. भारताविरुद्ध खेळवण्यात आलेल्या कसोटी सामन्यात त्याने बिनबाद २१७ धावांचा एकहाती डोंगर रचला होता. ज्याच्या सहाय्याने दक्षिण आफ्रिकेच्या संघाने तिसऱ्याच दिवशी हा सामना खिशात टाकला होता. या खेळीमध्ये एबीडीने १७ चौकार आणि २ षटकार मारले होते. दोन षटकारांपैकी एक षटकार थेट मैदानाच्या छतावर पोहोचला होता.

४४ चेंडू, १४९ धावा (विरुद्ध वेस्टइंडिज), २०१५, दुसरा कसोटी सामना- जोहान्सबर्ग
२०१५ हे वर्ष एबीडीच्या फलंदाजीसाठी खास ओळखलं गेलं. याच वर्षी त्याने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सर्वाधिक जलद शतक ठोकलं होतं. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या एबीडीने अविश्वसनीय खेळी केली असंच म्हणावं लागेल. कारण, तो फलंदाजीसाठी आला होता तेव्हा अवघे ११.३ षटक उरले होते. त्यामुळे पहिल्या चेंडूपासूनच त्याने फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. अवघ्या ३१ चेंडूंमध्ये त्याने शतकी खेळी करत क्रीडारसिकांची मनं जिंकली.

६६ चेंडू, १६२* (विरुद्ध वेस्टइंडिज), २०१५, विश्वचषक- सिडनी
२०१५ मध्येच विश्वचषक सामन्यात एबीडीने पुन्हा एकदा आपली आक्रमक खेळी दाखवून दिली. ६६ चेंडूंमध्ये त्याने १६२ धावा ठोकल्या. ज्यामध्ये १७ चौकार आणि ८ षटकारांचा समावेश होता. याच सामन्याच ड्यू प्लेसिससोबत सर्वात वेगवान १५० धावांची भागीदारी करत एक विक्रमही त्याने मोडित काढला होता.

६१ चेंडू, ११९ धावा, (विरुद्ध भारत), २०१५, पाचवा एकदिवसीय सामना- मुंबई<br />२०१५ मध्ये खेळवण्यात आलेल्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेमध्ये दोन्ही संघ २-२ अशा बरोबरीवर होते. अंतिम सामन्यासाठी दक्षिण आफ्रिका आणि भारतीय क्रिकेट संघ मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आले होते. या सामन्यात क्विंटन डि कॉक (१०९), फाफ ड्यूप्लेसिस (१३३) आणि एबीडी (११९) या तीन खेळाडूंच्या आक्रमणाच्या बळावर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ४३८ /४ अशी धावसंख्या केली. एबीडीने या खेळीत ६१ चेंडूंमध्ये ११ षटकार आणि तीन चौकारांच्या बळावर ११९ धावा केल्या.

१२६* (विरुद्ध ऑस्ट्रेलिया), २०१८, दुसरा कसोटी सामना- पोर्ट एलिझाबेथ
खुद्द एबी डिव्हिलियर्ससुद्धा त्याच्या या खेळीला कारकिर्दीतील सर्वाधिक अफलातून खेळी मानतो. घरगुती मैदानावरच दक्षिण आफ्रिका संघ पिछाडीवर होता. त्यातच डिव्हिलियर्सच्या १२६ धावांच्या संयमी खेळीने या संघाच्या बुडत्या नौकेला आधार दिला. ज्याच्या बळावर सहा विकेट्सने दक्षिण आफ्रिकेने हा कसोटी सामना आपल्या खिशात टाकला होता.