दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी फलंदाज हाशिम आमलाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. काही दिवसांपूर्वीच आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज डेल स्टेनने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली होती, त्यानंतर आफ्रिकेच्या आणखी एका मोठ्या क्रिकेटपटूने निवृत्ती स्विकारली आहे. आमलाने आपला निर्णय दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाला कळवला आहे.

नुकत्याच इंग्लंडमध्ये पार पडलेल्या विश्वचषक स्पर्धेत आमलाला त्याच्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नव्हती. आफ्रिकेचा संघ या स्पर्धेत गुणतालिकेत शेवटून दुसऱ्या स्थानावर फेकला गेला. या निराशाजनक कामगिरीनंतर आफ्रिकेच्या संघात सध्या मोठी उलथापालथ सुरु आहे. “माझ्या आतापर्यंतच्या प्रवासात मी अनेक गोष्टी शिकलो, नवीन मित्र बनवले आणि आफ्रिकेचा संघ ज्या लढाऊ बाण्यासाठी ओळखला जातो याचा मला कायम अभिमान राहिल.” हाशिम आमलाने निवृत्ती जाहीर करताना आपले विचार मांडले.