व्यग्र क्रिकेटमुळे कौटुंबिक जीवनावर परिणाम होत असल्याने निर्णय

पुढील महिन्यात मायदेशात होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करण्याचा निर्णय दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मॉर्नी मॉर्केलने घेतला आहे. सध्याच्या व्यग्र क्रिकेटमुळे कौटुंबिक जीवनावर बराचसा ताण येत असल्यामुळे क्रिकेटला अलविदा करीत असल्याचे मॉर्केलने सांगितले.

मायदेशात नुकत्याच झालेल्या भारताविरुद्धच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेच्या संघात मॉर्केलचा समावेश होता. निवृत्तीचा निर्णय घेणे सोपे नव्हते. हा एक अत्यंत आव्हानात्मक निर्णय होता. परंतु नवा अध्याय सुरू करण्यासाठी ही योग्य वेळ होती, असे ३३ वर्षीय मॉर्केलने स्पष्ट केले आहे.

२००६मध्ये भारताविरुद्ध कसोटी पदार्पण करणाऱ्या मॉर्केलने या प्रकारात आतापर्यंत ८३ सामन्यांत २९४ बळी मिळवले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांमध्ये त्याचा पाचवा क्रमांक लागतो. याशिवाय ११७ एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने १८८ बळी मिळवले आहेत, तर ४४ ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये ४७ बळी मिळवले आहेत.

माझी पत्नी परदेशी आहे आणि सध्याच्या व्यग्र आंतरराष्ट्रीय कार्यक्रमपत्रिकेमुळे कौटुंबिक आयुष्यावर बराचसा परिणाम होत होता. त्यामुळे ही प्राथमिकता लक्षात घेऊन भविष्याकडे वाटचाल करण्याचा मी निर्णय घेतला.

मॉर्नी मॉर्केल