२००८ विश्वचषकाचे आयोजन मिळावे यासाठी १० दशलक्ष डॉलर्स रक्कम फिफाला दिली मात्र ती लाच म्हणून नव्हे, असा अजब युक्तीवाद दक्षिण आफ्रिका फुटबॉल संघटनेच्या अध्यक्षांनी केला आहे. विश्वचषकाचे आयोजन मिळाल्यानंतर मतांसाठी आम्ही कशाला कोणाला लाच देऊ? असा सवाल दक्षिण आफ्रिका फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष डॅनी जॉर्डान यांनी केला. मी संपूर्ण आयुष्यात कुणालाही लाच दिलेली अथवा घेतलेली नाही. अमेरिकेने आपल्या आरोपपत्रात दक्षिण आफ्रिका फुटबॉल संघटनेने लाच दिल्याचा उल्लेख केला आहे. हा उल्लेख कोणाचा आहे, कशासाठी आहे याची मला कल्पना नसल्याचे जॉर्डान यांनी म्हटले आहे.
 कागदपत्रांनुसार दक्षिण आफ्रिका फुटबॉल संदर्भातील महत्त्वपूर्ण पदाधिकाऱ्याने पैशानी भरलेली सूटकेस पॅरिसमधील हॉटेलात सूपूर्द केली होती. या सूटकेसमधील पैसा फिफाचे माजी उपाध्यक्ष जॅक वॉर्नर यांच्याकडे गेल्याचे स्पष्ट झाले होते. वॉर्नर त्यावेळी उत्तर, मध्य अमेरिका आणि कॅरेबियन फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष होते.
ब्लाटर यांची चौकशी होणार?
फुटबॉल विश्वाला काळिमा लावणाऱ्या घोटाळ्याप्रकरणी फिफाचे नवनियुक्त अध्यक्ष सेप ब्लाटर यांची चौकशी होऊ शकते असे संकेत या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या स्विस अधिकाऱ्यांनी दिले आहेत.