दक्षिण आफ्रिकेच्या मार्को मॅरेसने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये जलद त्रिशतक झळकवण्याचा पराक्रम केला आहे. मार्कोने दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या स्थानिक सामन्यात बॉर्डर संघाचे प्रतिनिधीत्व करताना ईस्टर्न प्रोविन्स ईस्ट लंडन संघाविरुद्ध त्याने १९१ चेंडूत ३५ चौकार आणि १३ षटकारांच्या मदतीने नाबाद ३०० धावांची ऐतिहासिक खेळी केली. मार्कोने ६८ चेंडूत शतक साजरे केले. पुढच्या ७१ चेंडूत तो द्विशतकापर्यंत पोहचला. त्यानंतर फलंदाजीतील आक्रमकता कायम ठेवत त्याने अवघ्या ५२ चेंडूत अखेरच्या १०० धावा पूर्ण केल्या.

या डावात त्याला ब्रेडले विलियम्सने नाबाद ११३ धावांची खेळी करत मार्कोला सुरेख साथ दिली. दोघांनी मिळून ४४८ धावांची भागीदारी रचली. दोघांनी मिळून मैदानात धावांचा पाऊस पाडला. हा दक्षिण आफिकेसाठी एक विक्रमच आहे. आपल्या या दमदार खेळीच्या जोरावर मार्कोने तब्बल शंभर वर्षांपूर्वी इंग्लंडच्या चार्ली मॅकार्टनीने रचलेला विक्रम मोडीत काढला. चार्लीने १९२१ मध्ये नॉटींघम शायरकडून खेळताना २२१ चेंडूत ३०० धावांची खेळी केली होती.

याशिवाय इंग्लंडच्या डेनिस कॉमटॉनने १९४८-४९ मध्ये १८१ मिनिटांत ३०० धावा करण्याचा पराक्रम केला होता. मात्र, त्यावेळी त्याने किती चेंडू खेळले याची नोंद करण्यात आली नव्हती. त्यावेळी क्रिकेटमध्ये एका षटकात आठ चेंडू फेकले जायचे.