मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन

मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत वर्षांनुवर्षे चालत आलेले केनिया, इथिओपिया या आफ्रिकन राष्ट्रांचे वर्चस्व यंदा पुन्हा पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र भारताचे धावपटू विक्रमांच्या ईष्रेने सहभागी झाले आहेत.

भारतीय पुरुषांमध्ये नितेंद्र सिंग रावत स्वत:चा २०१६मधील विक्रम मोडण्यासाठी सज्ज झाला आहे. गतवर्षी चीन येथे झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत विजेतेपद मिळवणाऱ्या सेनादलाच्या गोपी थोनाकलचे त्याच्यापुढे प्रमुख आव्हान असेल. २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये नितेंद्र आणि गोपी दोघेही सहभागी झाले होते. गोपीने २ तास, १५ मिनिटे, २५ सेकंद अशी वेळ नोंदवली होती, तर मांडीचा स्नायू दुखावल्यामुळे नितेंद्रच्या कामगिरीवर परिणाम झाला होता. पूर्ण मॅरेथॉनमध्ये भाग घेतलेल्या भारताच्या १९ खेळाडूंपैकी श्रीनू बुघाथा आणि ए. बी. बलिअप्पा यांच्याकडूनही विशेष अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहेत.

भारतीय महिलांपैकी सुधा सिंग सर्वोत्तम कामगिरी नोंदवू शकेल. २०१०मध्ये गुवांगझोऊ येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुधाने सुवर्णपदक पटकावले होते. रिओ ऑलिम्पिकमध्ये स्टीपलचेस प्रकारात भाग घेण्यापूर्वी सुधाने या स्पर्धेत २ तास, ३९ मिनिटे, २८ सेकंद अशी वेळ नोंदवली होती. गेल्या वर्षी भारताकडून सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या ज्योती गवतेचे तिला प्रमुख आव्हान असेल. ज्योतीने २ तास, ५० मिनिटे, ५३ सेकंद वेळ नोंदवली होती. महिलांच्या पूर्ण मॅरेथॉनमध्ये भारताच्या १७ खेळाडू सहभागी होत आहेत.

आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्समधील १८ पुरुष आणि १२ महिला खेळाडू रविवारी होणाऱ्या शर्यतीत भाग घेणार आहेत. यात आफ्रिकन राष्ट्रांमधील धावपटूंचा भरणा अधिक आहे. गतविजेतेपद पटकावणारी केनियाची बोर्नेस किटूर आणि इथिओपियाची शोको गेनेमो यांच्यात सुवर्णपदकासाठी चुरस असेल.

नवा विक्रम प्रस्थापित करण्यासाठी मी उत्सुक आहे. एक महिना मी २३०० मीटर उंचीवर उटी येथे सराव करीत होतो. २ तास, १३ मिनिटे वेळ नोंदवण्याचे माझे लक्ष्य आहे.       – नितेंद्र सिंग रावत

बेंगळूरुत तीन महिने मी सराव केला. आशियाई मॅरेथॉन विजेतेपदामुळे माझा आत्मविश्वास उंचावला आहे. उत्तम वेळेनीशी स्पर्धा जिंकण्याचा माझा प्रयत्न असेल.       – गोपी थोनाकल

धरमशाला आणि बेंगळूरुतील सरावामुळे मी माझ्या आवडत्या मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत आत्मविश्वासाने सहभागी झाली आहे. २ तास, ३३ मिनिटे वेळेचे उद्दिष्ट मी समोर ठेवले आहे.       – सुधा सिंग