दक्षिण आफ्रिकेचा दणदणीत विजय

भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी तर दक्षिण आफ्रिकेच्या स्वातंत्र्य लढय़ाचे प्रणेते नेल्सन मंडेला यांच्या नावाने आयोजित क्रिकेट मालिकेत कटक येथील बाराबती स्टेडियमवर चाहत्यांच्या बेशिस्त वर्तनाने गालबोट लागले. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाचा डाव ९२ धावांतच गडगडला. दक्षिण आफ्रिकेने लक्ष्याचा पाठलाग सुरू केला. त्याचवेळी प्रेक्षकांनी खेळाडूंवर बाटल्या भिरकावण्यास सुरुवात केली. या प्रकारामुळे तब्बल तासाभराचा खेळ वाया गेला. अखेर खेळ सुरू झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने सहजपणे लक्ष्य गाठत मालिकेवर कब्जा केला. अ‍ॅल्बी मॉर्केलला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

छोटेखानी लक्ष्याचा पाठलाग करताना भरवशाचा हशिम अमला २ धावांवरच तंबूत परतला. फॅफ डू प्लेसिसने आक्रमक पवित्र स्वीकारला. मात्र रवीचंद्रन अश्विनने त्याला चकवले. त्याने १६ धावा केल्या. नेहमीच्या तडाखेबंद पवित्रा म्यान करणारा ए बी डी‘व्हिलियर्स १९ धावा करुन पुन्हा एकदा अश्विनचीच शिकार ठरला. पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा शिल्पकार जीन-पॉल डय़ुमिनीने नाबाद ३० धावांची खेळी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. भारतातर्फे अश्विनने २४ धावांत ३ बळी मिळवले.

तत्पूर्वी, भारतीय संघाने सहजपणे विकेट फेकत दक्षिण आफ्रिकेसमोर लोटांगण घातले. ख्रिस मॉरिसने शिखर धवनला पायचीत केले. त्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली धावचीत झाले आणि भारतीय संघाची लयच हरपली. सुरेश रैनाने २२ धावांची खेळी केली. मात्र अन्य एकाही भारतीय फलंदाजाला दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचा सामना करता आला नाही. भारतीय संघाचा डाव ९२ धावांतच गडगडला. मॉर्केलने केवळ १२ धावांमध्ये तीन बळी घेतले. इम्रान ताहीर (२/२४) व ख्रिस मॉरिस (२/१६) यांनीही गोलंदाजीत बहुमोल वाटा उचलला.

संक्षिप्त धावफलक

भारत : १७.२ षटकांत सर्व बाद ९२ (रोहित शर्मा २२, सुरेश रैना २२, आर. अश्विन ११; अ‍ॅल्बी मॉर्केल ३/१२, इम्रान ताहीर २/२४, ख्रिस मॉरिस २/१६) पराभूत वि. दक्षिण आफ्रिका : १७.१ षटकांत ४ बाद ९६ (जीन-पॉल डय़ुमिनी नाबाद ३०, ए बी डी’व्हिलियर्स १९, फॅफ डू प्लेसिस १६; आर. अश्विन ३/२४) सामनावीर : अ‍ॅल्बी मॉर्केल

कटकच्या मैदानावर चाहत्यांचे गैरवर्तन

भारतीय संघाच्या निराशाजनक कामगिरीने नाराज झालेल्या दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी सुरू असताना बाटल्या फेकण्यास सुरुवात केली. भारतातील बहुतांशी मैदानांवर बाटल्यांवर प्रतिबंध आहे. चाहत्यांना छोटय़ा पाऊचमध्ये पाणी दिले जाते. मात्र बाराबती मैदानावर प्रेक्षकांच्या हातात बाटल्या असल्याचे चित्र पाहायला मिळाले. हा प्रकार थांबल्यानंतर पंचांनी खेळ सुरु केला. मात्र दोनच षटकानंतर पुन्हा बाटल्या फेकण्यास सुरुवात झाल्याने पंचांनी खेळ थांबवला. प्रेक्षकांनी असे वर्तन करू नये, यासंदर्भात वारंवार ध्वनीक्षेपकाच्या माध्यमातून सूचना देण्यात आल्या. परिस्थिती निवळल्यानंतर खेळ पुन्हा सुरू करण्यात आला आणि दक्षिण आफ्रिकेने लक्ष्य गाठत विजय मिळवला.