दिवस ५ :  काठमांडू/पोखरा

दक्षिण आशियाई क्रीडा स्पध्रेच्या पाचव्या दिवशी शुक्रवारी भारताने एकूण ४१ पदकांची कमाई करीत अग्रस्थान कायम राखतानाच यजमान नेपाळपासूनचे अंतरही वाढवले आहे. भारताने १९ सुवर्ण, १८ रौप्य आणि चार कांस्यपदकांची भर घातली. आता भारताच्या खात्यावर ८१ सुवर्ण, ५९ रौप्य आणि २५ कांस्य अशी एकूण १६५ पदके जमा आहेत. दुसऱ्या स्थानावरील नेपाळच्या खात्यावर ११६ पदके (४१ सुवर्ण, २७ रौप्य, ४८ कांस्य) जमा आहेत. शुक्रवारी बॅडमिंटनपटूंनी चार सुवर्णपदकांची कमाई करीत वर्चस्व गाजवले.

अ‍ॅथलेटिक्स : १२ पदकांची कमाई

अ‍ॅथलेटिक्समध्ये भारताने १२ पदकांची कमाई केली असून, यात पुरुष आणि महिला गोळाफेकीतील दोन सुवर्णपदकांचा समावेश आहे. पुरुषांमध्ये तेजिंदर पाल सिंगने, तर महिलांमध्ये अभा खाटुआने सुवर्णपदक जिंकले.

वेटलिफ्टिंग: तिहेरी सुवर्ण

वेटलिफ्टिंगमध्ये भारताने तीन सुवर्ण आणि एका रौप्यपदकाची कमाई केली. महिलांमध्ये अचिंता शेऊली, राखी हॅल्डर आणि मनप्रीत कौर यांनी जेतेपद पटकावले, तर पुरुषांमध्ये अजय सिंगने रौप्यपदक मिळवले.

बॅडिमटन : सिरिल, अश्मितासह भारताचे वर्चस्व

अश्मिता छलिहा आणि सिरिल वर्मा यांनी बॅडमिंटन एकेरीत अनुक्रमे पुरुष आणि महिला गटाचे विजेतेपद पटकावले. याशिवाय अन्य वैयक्तिक बॅडिमटन प्रकारांमध्ये भारताने आठ पदके जिंकली. ध्रुव कपिलाने पुरुष दुहेरीत कृष्णा गारागाच्या साथीने आणि मिश्र दुहेरी गटात मेघना जक्कमपुडीसह सुवर्णपदके जिंकली. भारताने एकूण १० पदकांची कमाई केली असून, यात चार सुवर्ण, दोन रौप्य आणि दोन कांस्यपदकांचा समावेश आहे. माजी जागतिक कनिष्ठ रौप्यपदक विजेत्या सिरिलने आर्यमान टंडनचा १७-२१, २३-२१, २१-१३ असा पराभव केला. अश्मिताने गायत्री गोपिचंदला २१-१८, २५-२३ असे नामोहरम केले.

कबड्डी : महिला संघ अंतिम फेरीत

कबड्डीत भारतीय महिलांनी शेवटच्या सामन्यात यजमान नेपाळला ४३-१९ अशी धूळ चारत साखळीत अपराजित राहात गुणतालिकेत अग्रस्थान मिळवले. आता ९ डिसेंबर रोजी याच दोन संघांत अंतिम लढत होईल.

महिला विभागात भारताने सुरुवातीपासूनच चढाई-पकडीचा आक्रमक खेळ करीत पहिल्या डावात २१-९ अशी भक्कम आघाडी घेत विजयाचा पाया रचला होता. दुसऱ्या डावातदेखील तीच आक्रमकता कायम ठेवत २४ गुणांच्या फरकाने मोठा विजय मिळविला. अंतिम सामन्याची ही रंगीत तालीम होती. पुष्पा कुमारी, निशा, साक्षी, दीपिका यांनी या विजयात उत्कृष्ट खेळ केला.

पुरुषांमध्ये भारतीय पुरुष संघाने आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला ४९-२२ अशी धूळ चारत सलग दुसऱ्या साखळी विजयाची नोंद केली. सुरुवातीला १४-८ अशी भारताकडे आघाडी होती. शेवटची ५ मिनिटे पुकारली, तेव्हा ३५-२२ अशी आघाडी भारताकडे होती. या शेवटच्या पाच मिनिटांच्या खेळात भारताने धुवाधार खेळ करीत १४ गुणांची कमाई केली. या उलट पाकिस्तान संघाने आपले अवसान गाळल्यामुळे त्यांना एकही गुण मिळवता आला नाही. या स्पर्धेत आता भारत आणि श्रीलंका हे दोन संघ २-२ साखळी विजय मिळवत अग्रक्रमांकावर आहेत.

टेबल टेनिस : अँथनी, सुतिर्था अजिंक्य

अँथनी अमलराजने हरमनप्रीत देसाईला आणि सुतिर्था मुखर्जीने अयहिका मुखर्जीला नमवून अनुक्रमे पुरुष आणि महिला गटांमधील सुवर्णपदकांवर नाव कोरले. भारताने या स्पध्रेत आतापर्यंत सात सुवर्ण आणि पाच रौप्यपदके जिंकली आहेत. अँथनीने हरमनप्रीतला ६-११, ९-११, १०-१२, ११-७, ११-४, ११-९, ११-७ असे नमवले, तर सुतिर्थाने अयहिकाचा ८-११, ११-८, ६-२१, ११-४, १३-११, ११-८ असा पराभव केला.

खो-खो सुवर्णपदक विजेत्यांचा सन्मान

काठमांडू : दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा दुहेरी सुवर्णपदक मिळवण्याची किमया साधणाऱ्या भारताच्या पुरुष आणि महिला संघांना शुक्रवारी भारतीय खो-खो महासंघातर्फे (केकेएफआय)  अध्यक्ष सुधांशू मित्तल यांनी पाच लाख रुपयांचे रोख पारितोषिक जाहीर करण्यात आले.  २०१६मध्येही भारताने दोन्ही गटात विजेतेपद मिळवले होते.