दिवस ६

भारताने दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेच्या सहाव्या दिवशी पदकांच्या सुवर्णशतकासह द्विशतकाचा टप्पा ओलांडण्याची किमया साधली. जलतरण आणि कुस्ती या क्रीडा प्रकारांमधील वर्चस्वाच्या बळावर शनिवारी भारताने २९ सुवर्णपदकांसह ४९ पदकांची कमाई केली. भारताच्या खात्यावर आता २१४ पदके (११० सुवर्ण, ६९ रौप्य, ३५ कांस्य) जमा आहेत. गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर असलेल्या यजमान नेपाळने एकूण १४२ पदके जिंकली आहेत.

कुस्ती : चार सुवर्णपदके

कुस्तीपटूंनी ‘सॅफ’ अभियानाला शानदार प्रारंभ करताना चार सुवर्णपदकांची कमाई केली. सत्यवर्त कडियान (पुरुष ९७ किलो फ्रीस्टाइल), सुमित मलिक (पुरुष १२५ किलो फ्रीस्टाइल), गुरशरणप्रीत कौर (महिला ७६ किलो) आणि सरिता मोर (महिला ५७ किलो) यांनी सोनेरी यश मिळवले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक जिंकणाऱ्या सत्यवर्तने पाकिस्तानच्या ताबियार खानचा पराभव केला.

नेमबाजी : यशोमालिका सुरू

भारतीय नेमबाजांनी वर्चस्वाची यशोमालिका कायम राखताना तीन सुवर्णपदके प्राप्त केली. पुरुषांच्या २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात अनिश भानवालाने सुवर्णपदक पटकावले. मग त्याने भाबेश शेखावत आणि आदर्श सिंगच्या साथीने पुरुषांचे सांघिक विजेतेपद पटकावले. १० मीटर एअर रायफल मिश्र प्रकारात मेहुली घोष आणि यश वर्धन यांनी सुवर्णपदक मिळवले.

जलतरण : सप्तसुवर्णाच्या हिंदोळ्यावर

जलतरण क्रीडा प्रकारात भारताने वर्चस्वपूर्ण कामगिरी करताना सात सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्यपदक कमावले. श्रीहरी नटराज (१०० मीटर बॅकस्ट्रोक), रिचा मिश्रा (८०० मीटर फ्रीस्टाइल), शिवा एस. (४०० मीटर वैयक्तिक मिडले), माना पटेल (१०० मीटर बॅकस्ट्रोक), चाहत अरोरा (५० मीटर बॅकस्ट्रोक), लिकिथ एस. पी. (५० मीटर ब्रेस्टस्ट्रोक) आणि रुजुता भट (५० मीटर फ्रीस्टाइल) यांनी सुवर्णपदकांवर नाव कोरले. ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये ए. व्ही. जयाविणाने रौप्य आणि १०० मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात रिद्धिमा वीरेंद्रकुमारने कांस्यपदक पटकावले.

अ‍ॅथलेटिक्स : आठ पदकांची कमाई

अ‍ॅथलेटिक्स क्रीडा प्रकाराच्या अखेरच्या दिवशी भारताने आठ पदकांची कमाई केली. परंतु यात सुवर्णपदकाचा अभाव जाणवला. राशपाल सिंग (पुरुष मॅरेथॉन), मुहम्मद अफसल (पुरुष ८०० मीटर), शिवपाल सिंग (पुरुष भालाफेक) यांच्यासह पुरुषांच्या ४ बाय ४०० मीटर सांघिक रौप्यपदके भारताने मिळवली. शेर सिंग, ज्योती गवते, शर्मिला कुमारी आणि महिलांच्या ४ बाय ४०० मीटर सांघिक कांस्यपदकांचीही यात भर पडली.

वेटलिफ्टिंग : दोन सुवर्ण

वेटलिफ्टिंग प्रकारात भारताने शनिवारी दोन सुवर्णपदकांची भर घातली. शास्र्टी सिंगने १९० किलो वजन उचलून ८१ किलो वजनी गटात सुवर्णपदक कमावले. महिलांच्या ८७ किलो गटात अनुरुद्धने २०० किलो वजन उचलत सुवर्णपदक मिळवले.

कबड्डी : पुरुष संघाचा तिसरा विजय

काठमांडू : भारताच्या पुरुष कबड्डी संघाने बांगलादेशचा ४४-१९ असा पाडाव करीत साखळीत सलग तिसऱ्या विजयाची नोंद करीत आपला सुवर्णपदकाचा दावा अधिक पक्का केला. पहिल्या सत्रात २८-८ अशी भक्कम आघाडी घेणाऱ्या भारताने दुसऱ्या सत्रातदेखील दिमाखदार खेळ केला. प्रदीप नरवाल, दीपक हुडा, अमित, नवीन, सुरेंद्र यांच्या चढाई-पकडीच्या दमदार खेळामुळे भारताचा हा विजय सोपा झाला. भारताचा शेवटचा साखळी सामना दुबळ्या नेपाळशी होईल.

स्क्वॉश : तिघे जण अंतिम फेरीत

स्क्वॉश क्रीडा प्रकारात भारताच्या तीन खेळाडूंनी अंतिम फेरीत मजल मारली आहे. महिलांच्या एकेरीत सुनैना कुरुविल्लापुढे तन्वी खन्नाचे आव्हान असेल, तर पुरुष एकेरीत हरिंदर पाल संधूने पुरुषांच्या एकेरीत अंतिम फेरी गाठली आहे.