भारताने दक्षिण आशियाई क्रीडा स्पध्रेच्या दुसऱ्या दिवशी अ‍ॅथलेटिक्स आणि नेमबाजी या क्रीडा प्रकारांमध्ये वर्चस्व गाजवत ११ सुवर्णपदकांसह एकूण २७ पदकांची लयलूट केली आहे. त्यामुळे गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या भारताच्या खात्यावर १८ सुवर्ण, १६ रौप्य आणि ९ कांस्यपदकांसह एकूण ४३ पदके जमा आहेत. पहिल्या स्थानावरील यजमान नेपाळच्या खात्यावर ४४ पदके (२३ सुवर्ण, ९ रौप्य आणि १२ कांस्य) जमा आहेत.

नेमबाजी : मेहुली घोषला सुवर्ण

भारताच्या नेमबाजांनी महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारातील सर्व पदकांवर वर्चस्व गाजवले. यात मेहुली घोषच्या सुवर्णपदकाचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा संघटनेची मान्यता नसल्याने दक्षिण आशियाई क्रीडा स्पध्रेतील विश्वविक्रम अधिकृत मानला जात नाही. भारताने या प्रकारात सांघिक सुवर्णपदकसुद्धा प्राप्त केले. १९ वर्षीय मेहुलीने अंतिम फेरीत २५३.३ गुण मिळवले. श्रीयांका सादंगीने (२५०.८ गुण) रौप्य तर श्रिया अगरवालने (२२७.२ गुण) कांस्यपदक पटकावले.

खो-खो : दोन्ही संघ अंतिम फेरीत

खो-खो प्रकारात भारताच्या पुरुष आणि महिला संघांनी अंतिम फेरीत धडक मारली. बुधवारी रंगणाऱ्या अंतिम सामन्यात पुरुषांची बांगलादेशशी, तर महिलांची नेपाळशी गाठ पडणार आहे. पुरुषांच्या उपांत्य सामन्यात भारताने श्रीलंकेला २४-८ अशी एक डाव आणि आणि १६ गुणांनी धूळ चारली. राजू बुचानगरी (३ मिनिटे, ३० सेकंद), श्रेयस राऊळ (२.४० मि.) आणि बाळासाहेब पोकार्डे (२.१० मि.) यांनी भारतासाठी संरक्षणात दमदार कामगिरी केली, तर अभिनंदन पाटील (७ गडी), श्रेयस (४ गडी) आणि सागर पोद्दार (३ गडी) यांनी आक्रमणात योगदान दिले. महिलांच्या उपांत्य लढतीत महाराष्ट्राची पौर्णिमा सकपाळ आणि काजल भोर यांच्या कामगिरीमुळे भारताने श्रीलंकेचाच २५-१ असा सहज धुव्वा उडवून अंतिम फेरीतील स्थान पक्के केले. पौर्णिमाने तब्बल साडेचार मिनिटे संरक्षण केले, तर कृष्णा यादव आणि इशिता बिश्वास यांनी अनुक्रमे ४.१५ मि. आणि ३ मि. संरक्षण करून पौर्णिमाला उत्तम साथ दिली. परंतु आक्रमणात काजलने तब्बल सात गडी बाद करून श्रीलंकेच्या खेळाडूंवर दडपण आणले. ऐश्वर्या सावंत आणि सस्मिता शर्मा यांनी प्रत्येकी तीन खेळाडू बाद करून काजलसह भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.

टेबल टेनिस : भारताचे वर्चस्व

भारताच्या पुरुष आणि महिला संघांनी टेबल टेनिसमधील सुवर्णपदकांवर नाव कोरले. भारताने पुरुषांच्या अंतिम सामन्यात नेपाळचा ३-० असा पराभव केला, तर महिलांमध्ये श्रीलंकेचा ३-० असा पाडाव केला.

व्हॉलिबॉल : दुहेरी विजेतेपद

भारताने व्हॉलिबॉलमधील पुरुष आणि महिला अशा दोन्ही गटांचे विजेतेपद पटकावले. पुरुष संघाने पाकिस्तानचा २०-२५, २५-१५, २५-१७, २९-२७ असा पराभव केला, महिला संघाने नेपाळला २५-१७, २३-२५, २१-२५, २५-२०, १५-६ असे नामोहरम केले.

अ‍ॅथलेटिक्स : भारताला १० पदके

’  अ‍ॅथलेटिक्स क्रीडा प्रकारात भारताने मंगळवारी चार सुवर्णपदकांसह एकूण १० पदके जिंकली. अर्चना सुशींद्रन (महिला १०० मीटर), एम. जश्ना (महिला उंच उडी), सर्वेश कुशारे (पुरुष उंच उडी) आणि अजय सरोज (पुरुष १५०० मीटर) यांनी सुवर्णपदके पटकावली. भारताने १५०० पुरुषांच्या शर्यतीत एक सुवर्ण आणि एक रौप्यपदक पटकावले, तर महिलांच्या १५०० मीटर शर्यतीत एक रौप्य आणि एक कांस्यपदक मिळवले. पुरुषांमध्ये अजय कुमार सारोने ३.५४.१८ सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदकजिंकले, तर अजित कुमारने (३.५७.१८ सेकंद) रौप्यपदक मिळवले. महिलांमध्ये चंदाने (४.३४.५१ सेकंद) रौप्य आणि चित्रा पलकीझने (४.३५.४६ सेकंद) कांस्यपदक मिळवले.

फुटबॉल : महिला संघाला विजेतेपद

महिला फुटबॉलमध्ये भारताने मालदीवचा ५-० असा धुव्वा उडवला. यात बाला देवीने दोन गोल नोंदवले.