12 August 2020

News Flash

दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा : भारतीय पुरुष संघाला सुवर्णपदक

पुरुषांच्या लढतीत श्रीकांतने दिनुका करुणारत्नेचा १७-२१, २१-१५, २१-११ असा पराभव केला. मग सिरिल वर्माने भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली.

 

बॅडमिंटनमध्ये महिलांकडून रौप्यपदकाची खात्री

किदम्बी श्रीकांतच्या नेतृत्वाखाली भारताच्या पुरुष संघाने अंतिम फेरीत श्रीलंकेचा ३-१ असा पाडाव करून दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेमधील बॅडमिंटनचे सुवर्णपदक पटकावले. महिला संघाने पाकिस्तानचा ३-० असा धुव्वा उडवून अंतिम फेरी गाठली आहे. अंतिम फेरीत त्यांची श्रीलंकेशी गाठ पडणार आहे.

पुरुषांच्या लढतीत श्रीकांतने दिनुका करुणारत्नेचा १७-२१, २१-१५, २१-११ असा पराभव केला. मग सिरिल वर्माने भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली. कारण सिरिल २१-१७, ११-५ असा आघाडीवर असताना प्रतिस्पर्धी सचिन डायसने माघार घेतली. मग अरुण जॉर्ज आणि सन्याम शुक्ला जोडीने सचिन आणि बी. थरिंदू डुंबूकोलाकडून हार पत्करली. पण अखेरच्या लढतीत कृष्णा प्रसाद गंरगा आणि धृव कपिलाला २१-१४, २१-१८ असा पाडाव केला.

खो-खोमध्ये दोन्ही संघ उपांत्य फेरीत

भारताच्या पुरुष आणि महिला संघांनी श्रीलंका, नेपाळ व बांगलादेशला पराभूत करून दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेतील खो-खो क्रीडा प्रकारातील उपांत्य फेरीमधील स्थान पक्के केले आहे.

सोमवारी अव्वल साखळी पद्धतीने झालेल्या पुरुषांच्या सामन्यात भारताने नेपाळवर १७-५ असा एक डाव आणि १२ गुणांनी धमाकेदार विजय मिळवला. या सामन्यात भारताच्या दीपक माधवने संरक्षण करताना तीन मिनिटे, ३० सेकंद पळतीचा खेळ केला व आक्रमणात तीन गडी बाद केले, तपन पालने संरक्षण करताना तीन मिनिटे पळतीचा खेळ केला व आक्रमणात दोन खेळाडू बाद केले. नेपाळच्या बुद्धकुमार थापा व मिलन रायने चांगला खेळ केला.

महिला गटात भारताने नेपाळवर ११-३ असा एक डाव आणि ८ गुणांनी पराभव केला. भारताच्या पहिल्या डावात मुकेश तीन मिनिटे, १० सेकंद संरक्षण करून बाद झाली. त्यानंतर प्रियंका भोपीने संपूर्ण धुरा आपल्या खांद्यावर घेत नाबाद पाच मिनिटे, ५० सेकंद संरक्षण केले. दुसऱ्या डावात अपेक्षा सुताराने संरक्षण करताना तीन मिनिटे पळतीचा खेळ केला व आक्रमणात एक खेळाडू बाद केला. त्यानंतर कृष्णा यादवने संरक्षण करताना दोन मिनिटे, ४० सेकंद पळतीचा खेळ केला. शेवटी ऐश्वर्या सावंतने नाबाद खेळी करताना तीन मिनिटे रक्षण केले. कर्णधार नसरीनने चार खेळाडूंना बाद करून भारतासाठी मोलाचे योगदान दिले.

ट्रायथलॉनमध्ये चार पदकांची कमाई

नेपाळमध्ये सुरू असलेल्या १३व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये सोमवारी भारताने ट्रायथलॉन प्रकारात एक सुवर्णपदक, दोन रौप्यपदके आणि एक कांस्यपदक जिंकून एकूण चार पदकांची कमाई केली. पुरुषांच्या ट्रायथलॉन प्रकारात आदर्श एम एन सिनिमोलने भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले, तर प्रतिस्पर्धी ईश्वरजीत सिखॉमला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. महिलांच्या वैयक्तिक ट्रायथलॉन प्रकारात भारताच्या थौडाम सरोजिनी देवीने रौप्यपदक आणि मोहन प्रज्ञाने कांस्यपदक पटकावले. पुरुषांमध्ये सिनिमोलने ०१:०३:०६ सेकंदांची वेळ नोंदवत सुवर्णपदकावर नाव कोरले. महिलांमध्ये नेपाळच्या सोनी गुरुंगने ०१:१३:४५ सेकंदांच्या वेळेसह सुवर्णपदक प्राप्त केले, तर सरोजिनीने ०१:१४:०० सेकंद आणि प्रज्ञाने ०१:१४:५७ सेकंद वेळ नोंदवली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2019 7:30 am

Web Title: south asian sports competition akp 94
Next Stories
1 ला लिगा फुटबॉल : मेसी बार्सिलोनाचा पुन्हा तारणहार
2 गणेश उपाध्याय ‘नवोदित मुंबई-श्री’
3 ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान कसोटी मालिका : ऑस्ट्रेलियाच्या विजयात लायनचा सिंहाचा वाटा
Just Now!
X