भारताने दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत (सॅफ) सलग १३व्यांदा अग्रस्थान राखले. आतापर्यंतची विक्रमी पदकझेप घेताना भारताच्या खात्यावर ३१२ पदकांची नोंद होती. यात १७४ सुवर्ण, ९३ रौप्य आणि ४५ कांस्यपदकांचा समावेश होता. २०१६मध्ये गुवाहाटी आणि शिलाँग येथे झालेल्या ‘सॅफ’ स्पर्धेतील ३०९ पदकांचा आकडा या वेळी भारताने ओलांडला. परंतु १५ सुवर्णपदके कमी मिळवली.

यजमान नेपाळला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले, तर श्रीलंकेला तिसरे स्थान मिळाले. १९८४पासून भारताने ‘सॅफ’ स्पर्धेत वर्चस्व गाजवले आहे. या वेळी ४८७ खेळाडूंच्या पथकाने ही वर्चस्वपताका कायम राखली. मंगळवारी अखेरच्या दिवशी भारताने १८ पदकांची (१५ सुवर्ण, २ रौप्य, १ कांस्य) भर घातली. स्क्वॉशमध्ये भारताने एक सुवर्ण आणि एक रौप्यपदक जिंकले.

बॉक्सिंग : विकास, पिंकीला सुवर्ण

विकास कृष्णन (६९ किलो) आणि पिंकी राणी (५१ किलो) यांच्यासह भारताच्या बॉक्सिंगपटूंनी मंगळवारी सहा आणखी सुवर्णपदकांची भर घातली. भारताने बॉक्सिंगमध्ये आतापर्यंत एकूण १६ पदकांची (१२ सुवर्ण, ३ रौप्य, १ कांस्य) कमाई केली आहे. पुरुषांच्या विभागात स्पर्श कुमार (५२ किलो), नरिंदर (+९१ किलो) आणि महिलांमध्ये सोनिया लाथेर (५७ किलो), मंजू बाम्बोरिया (६४ किलो) यांनी सोनेरी यश मिळवले. राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेत्या विकासने अंतिम सामन्यात पाकिस्तानच्या गुल झैबचा ५-० असा पाडाव केला. नरिंदरने नेपाळच्या आशीष दुवाडीचा ५-० असा पराभव केला. स्पर्शने पाकिस्तानच्या सईद मुहम्मद आसिफला ४-१ असे नमवले. वरिंदर सिंगला (६० किलो) अंतिम सामन्यातील पराभवामुळे रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. सोनियाने क्रिसमी अयोमा दुलांजचा ५-० असा पराभव केला. पिंकीने नेपाळच्या राय मालाला ३-२ असे नामोहरम केले.

बास्केटबॉल : दुहेरी यश

भारताने बास्केटबॉल क्रीडा प्रकारात दुहेरी यश मिळवले. पुरुषांमध्ये भारताने श्रीलंकेचा १०१-६२ असा पराभव केला, तर महिलांमध्ये यजमान नेपाळला १२७-४६ असे नमवले.