तामिळनाडूच्या बाबा अपराजितने शानदार शतक झळकावून दक्षिण विभागाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला आहे. त्यामुळेच वानखेडे स्टेडियमवर शनिवारी झालेल्या देवधर करंडक क्रिकेट स्पध्रेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात दक्षिण विभागाने मध्य विभागाचा ११६ धावा आणि १३.३ षटके राखून पराभव केला. या पराभवानिशी दक्षिणेने दुलीप करंडक क्रिकेट स्पध्रेच्या अंतिम फेरीत पत्करलेल्या पराभवाचे उट्टे फेडले.
तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरणाऱ्या अपराजितने १०५ चेंडूंत दोन षटकार आणि आठ चौकारांसह ११३ धावांची आपली खेळी साकारली. त्यामुळे दक्षिण विभागाला ९ बाद २९६ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. अपराजितला करुण नायरने (६२ चेंडूंत ७४ धावा) छान साथ दिली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी १२४ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली.
त्यानंतर, मध्य विभागाची ३ बाद ४ धावा अशी त्रेधातिरपीट उडाली. परंतु त्यानंतर ३६.३ षटकांत १८० धावांत त्यांचा डाव आटोपला. त्यांचे तीन फलंदाज धावचीत झाले. मध्य विभागाकडून सातव्या क्रमांकावरील फलंदाज अर्जित गुप्ताने ४९ चेंडूंत सर्वाधिक ६६ धावा केल्या. यात पाच चौकार आणि पाच षटकारांचा समावेश होता. आता दक्षिण विभागाची १ डिसेंबरला उपांत्य फेरीत पश्चिम विभागाशी गाठ पडणार
आहे.

संक्षिप्त धावफलक
दक्षिण विभाग : ९ बाद २९६ (मयांक अगरवाल ३५, बाबा अपराजित ११३, करुण नायर ७४; पंकज सिंग ५/४५, जलाज सक्सेना २/४६) विजयी वि. मध्य विभाग : ३६.३ षटकांत सर्व बाद १८० (मुकुल डगर ४७, पीयूष चावला ३१, अर्जित गुप्ता ६६; आर. विनय कुमार ३/८, दर्शन मिसल २/४१).