सलामीच्या लढतीत भारताला हरवून कबड्डीजगताला आश्चर्याचा धक्का देणाऱ्या कोरियाने दुसऱ्या फळीसह खेळण्यात धन्यता मानत नवख्या अर्जेटिनाला ६८-४१ अशी आरामात धूळ चारली. या सलग दुसऱ्या विजयामुळे कोरियाने (१० गुण) विश्वचषक कबड्डी स्पध्रेच्या गुणतालिकेत ‘अ’ गटात अव्वल स्थानावर मुसंडी मारली आहे. याशिवाय जपान आणि इराणने दिमाखदार विजयाची नोंद केली.

द एरिना स्टेडियमवर रविवारी झालेल्या पहिल्या सामन्यात कोरियाच्या संघाने सुरुवात मुख्य फळीसह केली आणि तिसऱ्या मिनिटालाच पहिला लोण चढवला. अर्जेटिनाच्या आव्हानातील अनुभव आणि कौशल्याचा अभाव कोरियाच्या पथ्यावर पडला. त्यानंतर काही मिनिटांतच पहिल्या फळीतील खेळाडूंच्या जागी दुसऱ्या फळीतील खेळाडू उतरले. मग अनुक्रमे नवव्या, १५व्या आणि २०व्या मिनिटाला कोरियाने आणखी तीन लोण चढवले. त्यामुळे मध्यंतराला कोरियाने ४३-११ अशी एकतर्फी आघाडी मिळवली होती. दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला मात्र अर्जेटिनाच्या खेळाडूंनी आपला खेळ उंचावत २९व्या आणि ३३व्या मिनिटाला लोणची परतफेड केली. त्यानंतर ३६व्या मिनिटाला कोरियाने पाचवा लोण चढवला. चीओल ग्युन शिनने चढायांचे नऊ गुण मिळवले. अर्जेटिनाकडून फ्रँको कॅस्ट्रोने सर्वाधिक १० गुणांची कमाई केली.

दुसऱ्या सामन्यात जपानने अमेरिकेचा ४५-१९ अशा फरकाने पराभव केला. जपानने पहिल्याच सत्रात २९-६ अशी आघाडी घेतली होती. जपानकडून कर्णधार मासायुकी शिमोकावाने (७ गुण) दमदार चढाया केल्या. काझुहिरो ताकानोने त्याला छान साथ दिली.

तिसऱ्या सामन्यात गतउपविजेत्या इराणने थायलंडला सहा वेळा सर्व बाद करण्याची किमया साधताना ६४-२३ असा शानदार विजय संपादन करीत ‘ब’ गटातील दुसऱ्या विजयासह गटात पहिले स्थान राखले आहे. इराणने पहिल्या सत्रात सातव्या, १३व्या आणि १६व्या मिनिटाला असे अनुक्रमे तीन लोण चढवत मध्यंतराला ३४-७ अशी आघाडी मिळवली होती. दुसऱ्या सत्रातसुद्धा हेच वर्चस्व राखत इराणने आणखी तीन लोण चढवले. इराणकडून मेराज शेखच्या चढायांनी आणि सुलेमान पेहेलवानीच्या पकडींनी महत्त्वाची भूमिका बजावली. फरहाद मिलाघरदानने अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन केले. थायलंडकडून कर्णधार खोमसान थोंगखामने अप्रतिम खेळ केला.