कबड्डी हा आमच्यासाठी अजूनही नवखा खेळ असला तरी कासवाच्या गतीने आम्हाला आशियाई क्रीडा स्पर्धेत या खेळाचे सुवर्णपदक मिळवायचे आहे. त्यासाठी आमचा नियोजनबद्ध सराव सुरू आहे, असे दक्षिण कोरियाचा अव्वल दर्जाचा खेळाडू जांग कुन ली याने ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
कुन ली हा प्रो कबड्डी लीगमध्ये बंगाल वॉरियर्स संघाकडून खेळत आहे. या लीगमध्ये त्याने आपल्या पल्लेदार चढायांच्या जोरावर अनेक वेळा संघाला विजय मिळवून दिला आहे. या लीग स्पर्धेला मिळणाऱ्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे विशेषत: त्याला मिळालेल्या लोकप्रियतेमुळे तो अतिशय भारावून गेला आहे.
या लीगविषयी कुन ली म्हणाला, ही लीग पाहिली की मला आमच्या देशात आयोजित केल्या जाणाऱ्या फुटबॉल स्पर्धाची आठवण येते. तेथे फुटबॉल खेळावर लोक जीव ओवाळून टाकतात. मलादेखील फुटबॉलमध्ये कारकीर्द घडवायची होती मात्र त्या खेळात असलेली स्पर्धा लक्षात घेऊन मी कबड्डीकडे वळलो. कबड्डीद्वारा मला आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळाली आहे.
कबड्डी क्षेत्रात करिअर करण्याचा पश्चात्ताप होत आहे काय, असे विचारले असता कुन ली याने सांगितले, बिलकुल नाही. आपल्या ताकदीचा व शैलीचा देशासाठी खूप चांगला उपयोग होत आहे. याचेच मला खूप समाधान आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत आमच्या देशाने गतवेळी कांस्यपदक मिळविले आहे. आता आम्हाला २०१८च्या आशियाई स्पर्धेत सोनेरी कामगिरी करायची आहे. त्यासाठी आमच्या देशात नियोजनबद्ध संघबांधणी व सराव सुरू आहे.
तुमच्या देशात राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा नियमित होते काय, असे विचारले असता कुन ली म्हणाला, दरवर्षी वरिष्ठ गटाची राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा आयोजित केली जाते. त्यामध्ये १४ ते १६ संघ सहभागी होतात. प्रथम साखळी व नंतर बाद पद्धतीने हे सामने मॅटवरच होतात. या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे साधारणपणे ४०-४५ खेळाडूंची निवड केली जाते. या खेळाडूंचे दोन संघ तयार करून त्यांना सराव शिबिरात नियमित प्रशिक्षण दिले जाते. आजपर्यंत भारताच्या काही वरिष्ठ प्रशिक्षकांद्वारे या खेळाडूंना मार्गदर्शनही करण्यात येत आहे.
शाळेतही लोकप्रिय खेळ
’आमच्या देशात कबड्डीची लोकप्रियता वाढली आहे. शाळांमधून शारीरिक शिक्षणाच्या तासाला हा खेळ खेळला जातो. प्राथमिक स्तरावरदेखील या खेळाचे सामने आयोजित केले जातात. अद्याप सबज्युनिअर व कुमारांच्या राष्ट्रीय स्पर्धा घेतलेल्या नाहीत, मात्र विभागीय स्तरावर स्पर्धा आयोजित केल्या जातात. अनेक उद्योजकांचाही या खेळाला चांगला पाठिंबा मिळाला आहे, असेही कुन ली याने सांगितले.
’भारतात प्रो कबड्डी लीगद्वारे आम्हाला खूप प्रसिद्धी मिळाली आहे. आम्हाला सेलिब्रिटी बनविले आहे. जेव्हा काही लोक माझी स्वाक्षरी घेण्यासाठी किंवा छायाचित्रे काढण्यासाठी मला विनंती करतात, तेव्हा मला खूप आश्चर्याचा धक्का बसतो व आपण कबड्डी हा खेळ स्वीकारल्याचे सार्थक झाले असे वाटते. आमच्या देशातही अशी लीग आयोजित करण्यासाठी मी पुढाकार घेणार आहे असे कुन ली याने सांगितले.