तेल व नैसर्गिक वायू मंडळ (ओएनजीसी) संघाने आणि दक्षिण रेल्वे संघाने फेडरेशन चषक बास्केटबॉल स्पर्धेतील अनुक्रमे पुरुष व महिला गटाचे जेतेपद पटकावले.
शिवछत्रपती क्रीडानगरीत झालेल्या अंतिम लढतीत ओएनजीसीने ७१-५० अशा फरकाने आयओबीचा पराभव केला. मध्यंतराला दोन्ही संघांच्या खेळाडूंनी केलेल्या आक्रमक खेळामुळे ही लढत ३४-२८ अशी अटीतटीची रंगली होती. मात्र, मध्यंतरानंतर अम्रितपाल एस (२० गुण)आणि  विशेष बी (१३ गुण) यांनी ओएनजीसीला भक्कम आघाडी मिळवून देत जेतेपद निश्चित केले. पराभूत संघाकडून अमरज्योत सिंग (१४ गुण) आणि प्रसन्ना व्ही. (५ गुण) यांनी थोडाफार संघर्ष केला.
महिला गटात दक्षिण रेल्वेने छत्तीसगडचा  ८७-५६ असा धुव्वा उडवून जेतेपदावर नाव कोरले. मध्यंतरापर्यंत ४५-३२ अशी आघाडी घेत दक्षिण रेल्वेने विजय निश्चित केला होता. अलगुतामिल (१५ गुण) आणि सोनिया (९ गुण) हे या विजयात चमकल्या.