अमेरिकन ओपनच्या सेमी फायनलमध्ये धडक मारणारा राफेल नदाल दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झाला आहे. डोमनिक थीमवर मात करत राफेल नदालने सेमी फायनल गाठली होती. सेमी फायनलमध्ये त्याचा मुकाबला अर्जेंटिनाच्या ज्युआन मार्टिन डेल पोत्रोसोबत सुरु होता. मात्र ७-६ (७-३) ६-२ असे सेट झाल्यावर राफेल नदालची दुखापत वाढली आणि त्याने स्पर्धेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. खेळ सुरू झाल्यापासूनच नदालची प्रकृती ठीक नव्हती हे दिसून येत होते. आता तो सेमीफायलनमधून बाहेर पडल्याने ज्युआन मार्टिन डेल पोत्रोने फायनलमध्ये धडक मारली.

खेळ सुरू झाल्यानंतर जेव्हा पहिला सेट झाला तेव्हा नदालचा गुडघा दुखू लागला. आपल्याला त्रास होत असल्याची कल्पना नदालने त्याच्या प्रशिक्षकाला दिली. प्रशिक्षकाने गुडघ्याला केलेल्या मसाजनंतर नदाल दुसरा सेट खेळू शकला. मात्र त्यानंतर त्याला वेदना असह्य होऊ लागल्याने त्याने हा सामना सोडण्याचा निर्णय घेतला.

या सामन्याआधी नदाल आणि थीम यांच्यातला सामना रंगतदार झाला होता. सुमारे पाच तासांच्या आणि पाच सेटच्या लढतीत नदालने आपल्या कणखरतेचे दर्शन घडवले. थीमसोबत झालेल्या सामन्यात नदालला पहिल्या सेटमध्ये ०-६ अशी नामुष्की सहन करावी लागली. मात्र दुसऱ्या सेटमध्ये ६-४, ७-५ अशी बाजी मारत नदालने सामन्यात आघाडी घेतली आणि याच सामन्यानंतर सेमी फायलनही गाठली. आता मात्र गुडघ्याच्या दुखापतीमुळे नदालने सेमी फायनल सोडली.